
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी
संकटकाळात राज्य शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी;सर्वोतोपरी मदत करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या प्रत्येक नागरिकांना मदत करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
सोलापूर, दि. 24 जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले दिसून येत आहे. शेती पिकांचे जनावरांचे घरांचे व्यावसायिकांचे खूप मोठे नुकसान झालेले असून पूरग्रस्त नागरिकांनी अशा संकटाच्या काळात धीर धरावा, राज्य शासन संकटकाळात पूरग्रस्तांच्या पूर्णपणे पाठीशी असून नागरिकांना सर्वोतोपरी मदत केली जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील निमगाव तसेच दारफळ सीना या गावाला भेट देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली, त्यांनी दोन्ही गावातील नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजीत मोहिते पाटील, आमदार अभिजीत पाटील, विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते, जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, अतिवृष्टी व पूर आल्यामुळे ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्वांना शासनाकडून मदत दिली जाणार आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून दोन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापुढेही पूरग्रस्तांना आवश्यक मदत देण्यासाठी शासन हात आखडता घेणार नाही. शासन टंचाई काळात ज्या निकषाप्रमाणे मदत करते त्याप्रमाणेच अती पावसात, ओल्या दुष्काळात ही मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
दारफळ गावात पुरामुळे मोठे नुकसान झाले असून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने नदीने पात्र बदलले आणि गावाचा मोठा भाग पाण्यात गेला, तसेच लोकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे घरांचे, अन्नधान्याचे नुकसान झाले आहे. शेती, जनावरांचे नुकसान झाले आहे. शासन शेती, घरादारांकरिता, अन्नधान्य आदींसाठी मदत करणार असून रस्ते, शाळा, शेतरस्ते, वीजव्यवस्था आदी सुविधांसाठीही आवश्यक ती सर्व मदत करणार आहे. व्यावसायिकांनाही नुकसानीसाठी स्वतंत्र मदत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा तालुक्यातील निमगाव येथे नुकसानीची पाहणी केली आणि नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या. या संकटातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांना आवश्यक मदत करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.