
चिखले गावात “स्वच्छता हीच सेवा” अभियानांतर्गत स्वच्छतेचा आदर्श संदेश
दि. २४ सप्टेंबर २०२५ – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त सुरू असलेल्या “स्वच्छता ही सेवा” अभियानाचा (दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५) भाग म्हणून ग्रामपंचायत चिखले येथे तालुका स्तरीय स्वच्छता ज्योत प्रज्वलन व स्वच्छता रॅली या उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन पंचायत समिती डहाणू यांच्या गटविकास अधिकारी मा. पल्लवी सस्ते यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात स्वच्छता ज्योत प्रज्वलित करून करण्यात आली. या वेळी उपस्थित ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत गावभर जनजागृतीचा संदेश दिला गेला. त्यानंतर गावातून काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत ग्रामपंचायत चिखलेचे सरपंच श्री. अभिजित काटेला, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, उमेद (MSRLM) तालुका व्यवस्थापक, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कक्षाचे प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बचत गट महिला तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या प्रसंगी गटविकास अधिकारी मा. पल्लवी सस्ते यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात स्वच्छतेचे दैनंदिन जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “स्वच्छता ही केवळ गावाच्या सौंदर्यासाठी नसून आरोग्य, विकास आणि सामाजिक प्रगतीसाठीही अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने स्वतःपासून सुरुवात करून घर, शाळा, अंगण व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेकडे लक्ष दिल्यास गाव खऱ्या अर्थाने आदर्श ठरेल.”
सरपंच श्री. अभिजित काटेला यांनी देखील ग्रामस्थांना आवाहन करत सांगितले की, “गावाच्या प्रगतीसाठी स्वच्छता हा मूलभूत घटक आहे. स्वच्छ वातावरण हे आरोग्यदायी समाजाचे लक्षण असून प्रत्येकाने या अभियानात सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे.”
या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण झाली आणि समाजात स्वच्छतेचा एक प्रभावी संदेश पोहोचला. ग्रामपंचायत, शासकीय विभाग, महिला बचत गट, विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला.