logo

मदतीची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करा . लातूर जिल्हयाचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले .

*राज्य शासनाने दिलेली मदतीची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावी-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले*

• जिल्ह्यात पुरामुळे वाहून गेलेले रस्ते, पुलंच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना
• बॅरेज दुरुस्तीच्या तातडीच्या कामांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना; तातडीने कामे करा

लातूर, दि. 24 : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापर्यंत अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी राज्य शासनाने 244 कोटी 35 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तातडीने जमा करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज औसा शासकीय विश्रामगृह येथील आढावा बैठकीत दिल्या.

आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

सप्टेंबर महिन्यातही जिल्ह्यात अतिवृष्टी, पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. यामधून एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे पालकमंत्री श्री. भोसले यांनी सांगितले. पुरामध्ये वाहून गेलेल्या जनावरांच्या बाबतीत ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरून मदत वितरीत करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. राज्यात पुरामुळे बाधित झालेल्या रस्ते, पुलांची दुरुस्तीचे काम तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. त्यानुसार लातूर जिल्ह्यातील पुरामुळे वाहून गेलेल्या पूल, रस्त्यांचा सर्व्हे करून त्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तातडीने सादर करावा, असे पालकमंत्री यावेळी म्हणाले.

जिल्ह्यात विविध ठिकाणी पुरामध्ये अडकलेल्या शेतकरी, नागरिक यांच्या बचावासाठी जिल्हा प्रशासनाने अतिशय जलदगतीने कार्यवाही करत नागरिकांची सुटका केली आहे. याबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले. तसेच सप्टेंबर महिन्यातील नुकसानीचे पंचमाने करताना एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या. खरडून गेलेल्या जमिनींचा स्वतंत्र सर्व्हे करून मदत द्यावी, असे आ. पवार यावेळी म्हणाले.
उदगीर, जळकोट तालुक्यातही अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक गावांना जोडणारे पूल, रस्ते वाहून गेले आहेत. त्यांची तत्काळ दुरुस्ती आवश्यक असल्याचे आमदार संजय बनसोडे यांनी सांगितले.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. नेटके यांनी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या शेतपिक नुकसानीची माहिती दिली.
*****

12
153 views