
ओला दुष्काळ जाहीर करा व सरसकट कर्जमाफी द्या : डिजिटल प्रोटेस्टने सरकारला घेराव
यवतमाळ:-"विदर्भातील कापूस आणि सोयाबीन उद्ध्वस्त झाले आहेत, शेतकरी उध्वस्त झाला आहे! सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी करावी,हीच शेतकऱ्यांची मागणी आहे," या हाकेसह शेतकरी चळवळ,यवतमाळच्या वतीने शेतकरी आंदोलक प्रा.पंढरी पाठे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक २६ सप्टेंबर (शुक्रवार) रोजी दिवसभर डिजिटल प्रोटेस्ट करण्यात आला.
हा सरकारविरोधी डिजिटल प्रोटेस्ट आज सकाळी ठीक सहा वाजता सुरू झाला आणि सायंकाळी ठिक पाच वाजेपर्यंत पार पडला.
पश्चिम विदर्भातील यवतमाळ,अकोला,बुलढाणा,वाशिम आणि अमरावती जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांनी या आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदविला. व्हाट्सअप ग्रुप्समधून मोठ्या प्रमाणात मेसेज फॉरवर्ड झाले, शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी आपले व्हाट्सअँप डीपी बदलून सरकारविरोधी नाराजी व्यक्त केली.अनेकांनी फेसबुकवर फोटो व पोस्ट अपलोड केल्या,तर तरुण शेतकऱ्यांनी इंस्टाग्राम स्टोरीजद्वारे प्रचंड प्रमाणात आवाज बुलंद केला.
पत्रकार बांधवांनी देखील या डिजिटल प्रोटेस्टला व्यापक प्रसिद्धी दिली.प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया ग्रुप्सवर दिवसभर शेतकऱ्यांच्या मागण्या झळकत राहिल्या.
फक्त व्हाट्सअँप ग्रुप्सच्या माध्यमातून जवळपास दहा हजार शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले.फेसबुक व इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील हजारो युवा शेतकऱ्यांनी आपल्या हक्काचा आवाज बुलंद केला असल्याची माहिती शेतकरी चळवळीचे प्रा.पंढरी पाठे यांनी दिली.
शेतकऱ्यांची मागणी एकच "दौरे नकोत,पंचनामे नकोत; तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी करा!"