logo

गडचिरोली जिल्हा पर्यावरणपूरक पर्यटनासाठी आदर्श आहे

त्रिवेणी संगम, भामरागड – पामुलगौतम, पर्लकोटा आणि इंद्रावती नद्यांचा संगम, हा जिल्ह्यातील सर्वोत्तम सनसेट पॉइंट आहे.
सोमनूर त्रिवेणी संगम (सिरोंचा): सिरोंचा तालुक्यातील सोमनूर येथे इंद्रावती, गोदावरी आणि अदृश्य असलेली अंतरवाहिनी या नद्यांचा संगम होतो. हे स्थळ धार्मिक आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.
वैनगंगा-वर्धा संगम (चपराळा): गडचिरोलीच्या चपराळा येथे वैनगंगा आणि वर्धा या दोन मोठ्या नद्या एकत्र येतात आणि त्यांना 'प्राणहिता' असे नाव मिळते. ही नदी पुढे तेलंगणात गोदावरीला मिळते.
दास खडका धबधबा, कुरखेडा – सात पर्वतांमधून कोसळणारा हा धबधबा पावसाळ्यात विलोभनीय दिसतो.
जांभळी धबधबा, कोरची – मानवी हस्तक्षेप नसलेला हा धबधबा एक अनवट पर्यटनस्थळ आहे.
देवलमारी धबधबा, अहेरी – प्राणहिता नदीच्या काठावर असलेला हा धबधबा निसर्गाच्या कुशीत विसावलेला आहे.
जीतम व्हॅली आणि धबधबा, अहेरी – उत्तराखंडच्या नदीकिनाऱ्यासारखा अनुभव देणारा हा परिसर पांढऱ्या शुभ्र खडकांनी नटलेला आहे.

जंगल आणि जैवविविधतेचा खजिना
गडचिरोली जिल्ह्यातील जंगल जैवविविधतेने समृद्ध आहे. येथे अनेक दुर्मिळ वनस्पती आणि वन्यजीव आढळतात.
ग्लोरी ऑफ आलापल्ली, अहेरी – ११४ प्रकारच्या फुलझाडांनी आणि ५० हून अधिक प्रकारच्या वृक्षांनी समृद्ध असलेले हे जंगल जैवविविधतेचा अनमोल ठेवा आहे.
कमलापूर हत्ती कॅम्प, अहेरी – महाराष्ट्रातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प येथे असून, पर्यटकांना हत्तींना जवळून पाहण्याची संधी मिळते.
कोलमार्का रानम्हैस अभयारण्य, अहेरी – वन्यजीव निरीक्षणासाठी उत्तम पर्याय.
वाघाळा- स्थलांतरित पक्ष्यांचे गाव – एप्रिल-मे महिन्यात येथे स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन होते, त्यामुळे पक्षी निरीक्षक आणि छायाचित्रकारांसाठी हे नंदनवन आहे.

ऐतिहासिक किल्ले आणि प्राचीन मंदिरे
गडचिरोली जिल्ह्यातील गोंड आणि नागवंशीय राजांनी उभारलेले किल्ले आणि मंदिरे ऐतिहासिक महत्त्व राखून आहेत.
वैरागड किल्ला, आरमोरी – नागवंशीय राजांनी बांधलेला हा किल्ला खोबरागडी आणि वैलोचना नद्यांच्या संगमावर स्थित आहे.
टिपागड किल्ला, कोरची – उंच डोंगरावर वसलेला हा किल्ला आणि त्यावरील बारमाही पाण्याचा तलाव पर्यटकांचे आकर्षण आहे.
झापरागड किल्ला, छत्तीसगड सीमेलगत – अखंड दगडात कोरलेली ८ फूट उंच मारुतीची मूर्ती हे येथील वैशिष्ट्य.
सोमनूर संगम, सिरोंचा – इंद्रावती आणि गोदावरी नद्यांच्या संगमावर वसलेले सोमेश्वर मंदिर धार्मिक पर्यटनासाठी महत्त्वाचे ठिकाण आहे.
मार्कंडा मंदिर, चामोर्शी – ‘विदर्भाची काशी’ म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर खजुराहो शैलीतील उत्कृष्ट शिल्पकृतींसाठी प्रसिद्ध आहे. येथे वैनगंगा नदी उत्तरवाहिनी झाल्यामुळे या मंदिराला विशेष महत्व आहे. त्यामुळे अनेक भाविक पूर्वजांच्या नावे वैनगंगा नदीमध्ये पवित्र स्नान करून मंदिरात दर्शनासाठी जातात.
याशिवाय आरमोरीतील राम मंदिर, भंडारेश्वर मंदिर, गोरजाई माता मंदिर, कुरखेडा तालुक्यातील एकाष्म पाशानावर ५०० फुट उंचावरील अरततोंडी शिवमंदिर, खोब्रामेंढा, मौशीखांब येथील मेघनाथ मंदिर सुरजागड येथील आदिवासिंचे दैवत ठाकूर-देव ही धार्मिक स्थळेही पर्यटकांचे आकर्षण आहे.

आदिवासी संस्कृती आणि जीवनशैली
गडचिरोली हा महाराष्ट्रातील आदिवासीबहुल लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. येथे गोंड, माडिया आणि कोरकू जमाती राहतात.
अबुजमाड – नावाप्रमाणेच हा भाग रहस्यमय जंगल आहे – हा भाग आजही आदिवासी जीवनशैली जपतो.
रेला नृत्य – आदिवासी समाज पारंपरिक नृत्य करताना रंगीबेरंगी वेशभूषा आणि पारंपरिक वाद्ये वापरतो.
लेइंग – लाल मुंग्यांची चटणी – हा दुर्मिळ खाद्यपदार्थ आदिवासी संस्कृतीचा भाग आहे.

साहसी आणि इको-टूरिझमसाठी अनवट पर्यटनस्थळे

गडचिरोलीतील साहसी पर्यटकांसाठी काही अनोखी ठिकाणे आकर्षण ठरतात.

बाजागड – संगीत निर्माण करणारे दगड – येथे दगडांवर टाळी मारल्यास वेगवेगळे सुरेल ध्वनी निर्माण होतात.
लख्खामेंढा पहाडी, आलापल्ली – ट्रेकिंगसाठी उत्तम असलेले हे डोंगर, महाभारतकालीन लाक्षागृहाच्या आख्यायिकेशी जोडले जातात.
मुतनूर हिल स्टेशन, चामोर्शी – निसर्गाच्या सान्निध्यात ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम जागा.
व्यंकटापूर येथील उसळत्या पाण्याचे कुंड – येथे टाळ्या वाजवल्यास पाण्यात बुडबुडे निर्माण होतात, ही निसर्गाची अनोखी देणगी आहे.

गडचिरोली – इको-टूरिझमसाठी मुख्य आकर्षण
गडचिरोली जिल्हा पर्यावरणपूरक पर्यटनासाठी आदर्श आहे. निसर्ग, संस्कृती आणि इतिहासाचा अद्वितीय संगम येथे आढळतो. येथील घनदाट जंगल, नद्या, धबधबे, ऐतिहासिक गडकोट आणि आदिवासी जीवनशैली पर्यटकांसाठी अपूर्व आनंद देतात. निसर्गाचा अनुभव घेत, साहसी पर्यटन, ऐतिहासिक स्थळदर्शन आणि वन्यजीव निरीक्षणासाठी गडचिरोलीला नक्की भेट द्या!

- गजानन जाधव, जिल्हा माहिती अधिकारी, गडचिरोली

200
2709 views