
शेतकऱ्यांच्या अनुदानातुन वसुली न करणे व खात्याचे होल्ड काढण्याची बॅकांना सुचना :-आ राणाजगजितसिंह पाटील
जिल्हा प्रतिनिधी (विकास वाघ धाराशिव)
अडचण आल्यास संपर्क साधण्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आवाहन
अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत बँकांनी शेतकऱ्यांकडून कर्जवसुली करू नये, शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवरील होल्ड तातडीने हटवावेत, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानातून, मदतीतून वसुली करू नये, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या व लीड बँक मॅनेजर मार्फत सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती मित्रचे उपाध्यक्ष, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता सर्व बँकांची बैठक घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी ऑनलाइन
बैठक घेऊन बँकांना आदेश दिले आहेत. मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले आहे. घरात धान्य नाही, गुरांना चारा नाही, शेतात उभे पिक उरले नाही, अशी बिकट अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.
अशा वेदनादायी परिस्थितीतही बँका शेतकऱ्यांच्या खात्यांवर होल्ड लावत आहेत. त्यामुळे त्यांच्या नावावर जमा होणारे सरकारी अनुदान, मदत रक्कम, घरकुल योजना निधी किंवा इतर शासकीय योजनांचे पैसे ते काढू शकत नाहीत.आताच्या परिस्थितीत त्यांच्या खात्यावरील असलेली रक्कम त्यांच्यासाठी जीवनावश्यक खर्च भागवण्याचा एकमेव आधार आहे. या अनुषंगाने बँकांची बैठक घेऊन त्यांना आदेश द्यावेत, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली होती, असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवरील सर्व होल्ड हटवावेत, कर्जवसुली करू नये, सर्व शासकीय अनुदान व मदतीची रक्कम होल्ड न लावता थेट शेतकऱ्यांना, नागरिकांना उपलब्ध करून द्यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना दिले आहेत. याउपरही कोणाला अशा अडचणींचा सामना करावा लागत असल्यास 8888627777 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मित्रचे उपाध्यक्ष, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.