logo

खड्डे आंदोलन तूर्तास स्थगित, रवी जाधव यांचा निर्णय...!

प्रतिनिधी. अनिकेत मेस्त्री

नगरपरिषदेकडून खड्डे बुजविण्याचे आश्वासन; पोलीसांच्या विनंतीमुळे नियोजित आंदोलन पुढे...

सावंतवाडी, ता. २९: नगरपालिका प्रशासन आणि सार्वजनिक

बांधकाम विभागाकडून खड्डे भरण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेण्यात आल्यामुळे आपण पुकारलेले खड्डयांविरोधात होणारे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती सामाजिक बांधिलकीचे पदाधिकारी रवी जाधव यांनी दिली. सावंतवाडी नगरपरिषदेने त्याची दखल घेत खड्डे बुजवण्याचे आश्वासन दिल्याने तसेच पोलिसांच्या विनंतीला मान देऊन हा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

शहरातील रस्ते आणि बस स्टँडवरील खड्डयांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जाधव यांनी हे अनोखे आंदोलन करण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर सावंतवाडी नगरपरिषदेने तयार डांबर प्राप्त झाले असून पावसाचा जोर कमी होताच तात्काळ खड्डे बुजविण्यात येतील, असे लेखी पत्र दिले आहे. तर बस स्टँडवरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात तात्काळ बुजविण्यात आले आहेत, असे बस स्थानक प्रशासनाचे म्हणणे आहे. याशिवाय शहरात ४ ऑक्टोबरपर्यंत जमावबंदी लागू असल्यामुळे आणि पोलिसांनी केलेल्या विनंतीला मान देऊन रवी जाधव यांनी सद्यस्थितीत हे आंदोलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

या आंदोलनाच्या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्तावित असलेल्या हायवे आणि भोसले कॉलेज रोडवरील खड्डयांसंदर्भात केलेल्या पत्राची मात्र अद्याप कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही, अशी नाराजी रवी जाधव यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी प्रसिद्धी पत्रकातून स्पष्ट केले आहे की, नगरपरिषद आणि बस स्टँड वगळता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात पुढील आंदोलन नियोजित तारखेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरच केले जाईल.

5
89 views