logo

प्रा. शिवहरी मिसाळ यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न


पिंपळगाव सराई (ता. बुलढाणा) : जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव सराई येथे दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी प्राध्यापक शिवहरी मिसाळ यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी भूषविले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रा. मिसाळ यांचा परिचय विद्यालयाचे पर्यवेक्षक संजय पिवटे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुधाकर सस्ते यांनी केले तर आभार प्रदर्शन सतीश शेटे यांनी केले.

या प्रसंगी विद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन प्रा. शिवहरी मिसाळ यांचा सत्कार करण्यात आला. मंचावर पर्यवेक्षक संजय पिवटे, जनता प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मला खुर्दे व ज्येष्ठ शिक्षक सुदाम चंद्रे यांची उपस्थिती होती.

सत्कार प्रसंगी विविध मान्यवरांनी प्रा. मिसाळ यांच्या कार्याचा गौरव केला. कलाशिक्षक रवींद्र खानंदे यांनी “प्रा. शिवहरी मिसाळ म्हणजे मनाने आणि शरीराने काटक असलेले व्यक्तिमत्व आहे” असे गौरवोद्गार काढले. विज्ञान शिक्षक सुहास कुलकर्णी यांनी “मिसाळ सर स्वीकारलेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडत असत” असे म्हटले. तर सौ. निर्मला खुर्दे यांनी “प्रशासकीय कामात आलेल्या अडचणी सोडविणे किंवा मार्गदर्शन करणे यासाठी ते सदैव तत्पर असत” असे सांगितले.

सत्काराला उत्तर देताना प्रा. शिवहरी मिसाळ म्हणाले, “वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तबगार आणि यशस्वी झालेले विद्यार्थी हेच माझे या सेवानिवृत्तीच्या प्रसंगी समाधान आहे.”

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी नमूद केले की, “शिवहरी मिसाळ यांचा उल्लेखनीय गुण म्हणजे स्पष्टवक्तेपणा आणि प्रामाणिकपणे काम करण्याची वृत्ती होय.”

सर्व शिक्षक व कर्मचारी बंधू-भगिनींच्या सहकार्याने हा सेवापूर्ती सोहळा उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात संपन्न झाला.

67
1393 views