logo

विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळावे – प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन

नांदेड, दि. १ ः “पदवी मिळविण्यापुरते शिक्षण मर्यादित न ठेवता विद्यार्थी संशोधन क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य करावेत,” असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांनी केले. ते विद्यापीठात आयोजित संशोधन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.


डॉ. महाजन म्हणाले की, आजच्या काळात संशोधनास विलक्षण महत्त्व लाभले आहे. समाजातील प्रश्नांची सोडवणूक करणे आणि जीवनमान उन्नत करणे हे संशोधनाचे मूलभूत ध्येय असावे. संशोधन केवळ सैद्धांतिक न राहता समाजपरिवर्तनाशी जोडलेले असणे आवश्यक आहे. संशोधनासाठी असंख्य विषय आपल्या परिसरातच उपलब्ध असून, यासाठी विद्यार्थ्यांनी संशोधक वृत्ती जोपासणे गरजेचे आहे. विद्यापीठ विद्यार्थ्यांना आवश्यक संशोधनपर सुविधा उपलब्ध करून देईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

या पार्श्वभूमीवर विद्यापीठ कॅम्पससह लातूर व परभणी येथील केंद्रांसाठी स्वतंत्रपणे ‘अविष्कार’ संशोधन स्पर्धेचे आयोजन नांदेड येथे करण्यात आले आहे. यंदा सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना या स्पर्धेचा लाभ होणार आहे. स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी घेतलेल्या कार्यशाळेत दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या कार्यशाळेत प्रा. हेमलता भोसले, डॉ. वसंत वाघ, डॉ. बाबुराव जाधव व डॉ. योगिनी सातारकर यांनी संशोधनाच्या संकल्पना, माहिती संकलन व अन्वेषणपद्धती, क्षेत्राभ्यास, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर, समाजपरिवर्तनाभिमुख दृष्टी, तसेच भीत्तीपत्रक (पोस्टर) सादरीकरण अशा विविध अंगांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅम्पस ‘अविष्कार’ स्पर्धेच्या समन्वयक डॉ. नीना गोगटे यांनी केले. समारोपप्रसंगी भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलाचे प्रमुख प्रा. दिलीप चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना संशोधनविषयक दिशा दिली.


विद्यापीठाच्या वतीने येत्या १० ऑक्टोबर रोजी ‘अविष्कार २०२६’ या संशोधन स्पर्धेचे आयोजन होणार असून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन तज्ज्ञ मार्गदर्शकांनी केले.

5
144 views