logo

जमीन वादातून काकीवर जीवघेणा हल्ला: आरोपीला दोन वर्षांची शिक्षा

जमीन वादातून चाचीवर जीवघेणा हल्ला: आरोपीला दोन वर्षांची शिक्षा
​बुलढाणा (प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यातील चिखली न्यायालयाने जमीन वादातून आपल्या चाचीवर (काकी) बांबूच्या काठीने गंभीर हल्ला करून तिला जखमी करणाऱ्या गणेश फकीरा सिंपने (वय ४०, रा. शिरपूर) या आरोपीला दोन वर्षांचा सश्रम कारावास आणि ₹१०,०००/- दंडाची शिक्षा सुनावली आहे. रायपुर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाच्या अथक प्रयत्नांमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही दोषसिद्धी झाली आहे.
​घटनेचा तपशील
​ही घटना १२ सप्टेंबर २०२३ रोजी घडली. फिर्यादी सौ. रुख्मीणा देवलाल सिंपने (वय ५५, रा. सावरगाव डुकरे) या त्यांच्या ई-क्लास क्षेत्रातील शेतजमिनीत सोयाबीन पाहण्यासाठी गेल्या होत्या. ही जमीन त्यांचे सासरे अनेक वर्षांपासून कसत होते. त्यावेळी, आरोपी गणेश सिंपने तेथे आला आणि त्याने रुख्मीणा सिंपने यांना 'तुम्ही या शेतात कशा आलात' असे विचारले.
​यावरून दोघांमध्ये वाद झाला. गणेश सिंपने याने आपल्या हातातील बांबूची काडी काढून सौ. रुख्मीणा यांच्या डाव्या हातावर आणि डाव्या पायावर मारहाण केली. रुख्मीणा यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, गणेशने त्यांचे केस ओढून त्यांना खाली पाडले आणि 'पुन्हा जर या शेतात आली तर तुझा आणि तुझ्या मुलाचा खून करून टाकीन' अशी धमकी दिली.
​शेतात उपस्थित असलेल्या लोकांनी (भास्कर आणि इतरांनी) मध्यस्थी करून रुख्मीणा यांना सोडवले आणि त्यांना उपचारासाठी चिखली येथील श्रीकृपा जंजाळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
​कलम ३२६ ची वाढ आणि आरोपीचा शोध
​रुख्मीणा सिंपने यांच्या जबाबानुसार, रायपुर पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक २०५/२०२३ कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. उपचारादरम्यान वैद्यकीय अहवालात जख्मीच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले. गंभीर दुखापत झाल्यामुळे गुन्ह्यात कलम ३२६ भादवि (धोकादायक हत्यार किंवा साधनांनी स्वेच्छेने गंभीर दुखापत पोहोचवणे) ची वाढ करण्यात आली.
​या गुन्ह्यात आरोपी गणेश सिंपने घटनेपासून फरार होता. सुमारे एक ते सव्वा वर्ष तो पोलिसांना सापडला नाही. त्यामुळे त्याचा तपास सुरू ठेवत, रायपुर पोलिसांनी न्यायालयामध्ये सीआरपीसी कलम २९९ नुसार दोषारोपपत्र दाखल केले.
​फरार आरोपीला अटक आणि न्याय
​रायपुर पोलीस स्टेशनचे सफौ राजेश वसंत गवई (ब.नं १७४७) आणि त्यांचे मदतनीस नापोका आशिष लक्ष्मणराव काकडे (ब.नं १९६४) हे आरोपीचा शोध घेत होते. अंदाजे सव्वा वर्षांनंतर दिनांक ३०/०४/२०२५ रोजी गणेश सिंपने हा त्याच्या वडिलांच्या निधनानंतर सोनेवाडी येथे येत असल्याची माहिती नापोका आशिष काकडे यांना मिळाली. त्यांनी तातडीने सापळा रचून त्याला सोनेवाडी बस स्टॉपवर ताब्यात घेतले आणि पोलीस स्टेशनला हजर केले.
​पोहेका शेख राजीक (ब.नं १७२६) यांनी आरोपीला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अटक केली आणि चिखली न्यायालयात हजर केले.
​या खटल्यामध्ये, पोलीस अंमलदार सफौ संजय जाधव (ब.नं १५९३) यांनी साक्षीदारांना वेळेवर हजर केले. कोर्ट पैरवी पोहेका दिलीप पडघान (ब.नं ४०९) आणि सरकारी विधी अधिकारी शेख बशीर साहेब यांच्या यशस्वी युक्तिवादानंतर, अखेरीस २९ सप्टेंबर २०२५ रोजी मा. न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, चिखली न्यायालयाने आरोपी गणेश फकीरा सिंपने याला कलम ३२६ भादवि अंतर्गत दोन वर्षांचा कारावास आणि ₹१०,०००/- दंड (दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास) अशी शिक्षा सुनावली.
​या दोषसिद्धीमुळे फिर्यादी सौ. रुख्मीणा देवलाल सिंपने यांना न्याय मिळाला असून, रायपुर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाच्या परिश्रमाचे यश सिद्ध झाले आहे.

44
1516 views