
पोंदा हायस्कूलमध्ये वर्तमानपत्राच्या स्वागताने रंगला दसरा उत्सव
पोंदा हायस्कूलमध्ये वर्तमानपत्राच्या स्वागताने रंगला दसरा उत्सव
अमळनेर प्रतिनिधी
डहाणू एज्युकेशन ट्रस्ट संचलित के.एल. पोंदा हायस्कूलमध्ये यंदाचा विजयादशमी सण पारंपरिकतेसोबत नावीन्यपूर्ण उपक्रमांनी उजळून निघाला. शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका सौ. अनुपमा जाधव यांनी या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले.
आपल्या प्रास्ताविकात त्यांनी सांगितले की, “दसरा हा सण केवळ रावण दहनाचा प्रतीक नाही तर तो आपल्यातील नकारात्मकतेवर विजय मिळवण्याचा, समर्पणाचा आणि एकात्मतेचा संदेश देतो. जीवनात नेहमी सकारात्मकतेकडे वाटचाल करावी, हीच दसऱ्याची खरी प्रेरणा आहे.”
या उपक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. सोपान इंगळे सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना विजय, ज्ञान व सद्गुणांच्या मार्गाने चालण्याचा सल्ला दिला. उपमुख्याध्यापिका सौ. रसिका घागस मॅडम, पर्यवेक्षक श्री. सुनिल मोरे सर व पर्यवेक्षिका सौ. मनीषा पटेल मॅडम यांनीही शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांशी दसऱ्याचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भ उलगडला.
विशेष म्हणजे या कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत फुलांच्या पुष्पगुच्छाऐवजी वर्तमानपत्र देऊन करण्यात आले. त्यानंतर विविध वर्गांमध्ये विद्यार्थी स्वतः वर्तमानपत्र वाचून दाखवत वाचन संस्कृतीला चालना दिली. ऐतिहासिक गोष्टींचे सादरीकरण, सणाचे महत्त्व व सकारात्मकतेचा संदेश यामुळे कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण झाला.
विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा मनमुराद आनंद घेतला आणि “दसरा वेगळ्या पद्धतीनेही साजरा होऊ शकतो” याचा अनुभव घेतला. शेवटी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी एकमेकांना दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा देऊन एकात्मतेचा सोहळा अधिक संस्मरणीय केला.