logo

शासनाकडून शेतकऱ्यांना मिळालेली मदत कर्ज खात्‍यात वळती करु नये : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले*



नांदेड दि. 3 ऑक्टोबर :- जिल्ह्यात ज्‍या शेतकऱ्यांच्या खात्‍यावर शासनाकडून मदतीची रक्‍कम जमा करण्‍यात आली आहे त्‍या शेतकऱ्यांच्या खात्‍यावर जमा झालेली मदतीची रक्‍कम बॅंकांनी कर्ज खात्‍यात अथवा इतर वसुलीसाठी वळती करु नये, असे निर्देश जिल्‍हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्‍हा अग्रणी बॅंक व जिल्‍हा उपनिबंधक सहकारी संस्‍था यांना दिले आहेत.

नांदेड जिल्‍ह्यात ऑगस्‍ट २०२५ मध्‍ये अतिवृष्‍टी व पुर यामुळे ७ लाख ७४ हजार ३१३ इतक्‍या शेतकऱ्यांचे ६,४८,५३३.२१ हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. त्‍याअनुषंगाने जिल्‍हा प्रशासनाचे अहवालावरुन शासनाने एकूण ५५३.३४ कोटी रुपये मदत निधी जिल्‍ह्यातील बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्‍यासाठी मंजुर केला आहे. ही मंजुर रक्‍कम बाधित शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे वाटप करण्‍यात येत आहे. आता पर्यंत जिल्‍हृयातील ४,८२,६७४ इतक्‍या शेतकऱ्यांना ३६२.०३ कोटी इतक्‍या रकमेचे वाटप करण्‍यासाठीची माहिती ऑनलाईन प्रणालीवर संबंधीत तहसील कार्यालयातून भरण्‍यात आली आहे. उर्वरीत शेतकरी यांची माहिती संगणकीय प्रणालीवर भरण्‍याची कार्यवाही सुरु आहे.

माहिती भरण्‍यात आलेल्‍या शेतकऱ्यांचे वि.के. नंबर त्‍या गावच्या तलाठी यांच्यमार्फत गावात प्रसिध्‍द करण्‍यात आले आहेत. या वि.के. नंबरद्वारे सेतू सुविधा केंद्रावर जाऊन ई-केवायसी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्‍यावर थेट मदतीची रक्‍कम डिबीटी पध्‍दतीने शासनामार्फत जमा होत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

3
288 views