जनता विद्यालयात महापुरुषांना अभिवादन
दि. ३ ऑक्टोबर, पिंपळगाव सराई . जनता विद्यालय पिंपळगाव सराई येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांद्वारे या महान नेत्यांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे अध्यक्षस्थानी पारंपरिक गांधी वेशभूषेत आलेला इयत्ता सहावीतील विद्यार्थी समर्थ खेन्ते याची उपस्थिती होय. विद्यार्थ्यांमधील या अनोख्या अध्यक्षीय भूमिकेने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. मंचावर मार्गदर्शक सोनम मुकलवार, विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद ठोंबरे, ज्येष्ठ शिक्षक रवींद्र खानंदे तसेच कार्यक्रमाचे आयोजक देविदास दळवी यांची मान्यवर उपस्थिती होती. या वेळी प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गांधीजींच्या सत्य व अहिंसेच्या तत्त्वज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच शास्त्रीजींचे "जय जवान, जय किसान" हे घोषवाक्य आजच्या काळातही तितकेच प्रेरणादायी असून त्याचा जीवनात अवलंब करणे आवश्यक असल्याचे सांगितले. ज्येष्ठ शिक्षक रवींद्र खानंदे यांनी महापुरुषांच्या विचारातून शिकण्याचा संदेश दिला. कार्यक्रमात विद्यार्थिनी वैष्णवी सोनुने हिने प्रभावी सूत्रसंचालन केले, तर आभार प्रदर्शन दिया देशमुख विद्यार्थिनीनेच करून कार्यक्रमाला सुंदर पूर्णविराम दिला. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली नाटिका होती. या नाटिकेतून गांधीजींचे साधेपण, सत्याग्रह, अहिंसा आणि शास्त्रीजींच्या कर्तृत्वपूर्ण जीवनाचे प्रभावी चित्रण विद्यार्थ्यांनी सादर केले. नाटिकेला उपस्थित मान्यवर व प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची प्रेरणा जागवली गेली असून, महान नेत्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन जीवन जगण्याचे मौल्यवान संस्कार या निमित्ताने विद्यार्थ्यांना मिळाले. विद्यालयाच्या सर्व घटकांचे सहकार्य लाभले