logo

TWJ कंपनी घोटाळा : “टोरेस” नंतर महाराष्ट्रातील दुसरी मोठी आर्थिक फसवणूक हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा फटका, सुमारे १२०० कोटींचा घोटाळा

महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. TWJ कंपनी (Trade With Jazz) या नावाने कार्यरत असलेल्या या संस्थेने गुंतवणूकदारांना “हाय रिटर्न्स” म्हणजेच अत्यल्प कालावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. राज्यातील चिपळूण, यवतमाळ आणि पुणे येथे या कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल झाले असून, यामुळे राज्यभरातील गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

या कंपनीने २०२३ च्या सुमारास शेअर ट्रेडिंग, डिजिटल इन्व्हेस्टमेंट आणि फायनान्शियल ॲडव्हायजरीच्या नावाखाली अनेक शहरांत शाखा उघडल्या होत्या. सुरुवातीला गुंतवणूकदारांना दरमहा ३ ते ५ टक्के परतावा देऊन त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. अनेकांनी आपल्या बचती, कर्ज, सोनं गहाण ठेवूनही गुंतवणूक केली. मात्र, २०२५ च्या सुरुवातीपासून कंपनीने परतावा देणे थांबवले आणि गुंतवणूकदारांना आश्वासन देत वेळकाढूपणा सुरू केला. शेवटी मार्च २०२५ नंतर कंपनीचे कार्यालये बंद पडू लागली, वेबसाइट व ॲप्लिकेशन्स निष्क्रिय झाली आणि लोकांचे कोट्यवधी रुपये बुडाले.

TWJ कंपनीच्या महाराष्ट्रातील सुमारे २० हून अधिक शाखा कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. या शाखांमधून जवळपास अकरा हजारांहून अधिक गुंतवणूकदारांनी पैसे जमा केले होते. यापैकी प्रमुख शाखा चिपळूण, यवतमाळ, पुणे (कर्वेनगर), कोल्हापूर, सांगली, नागपूर, ठाणे, नवीमुंबई आणी रत्नागिरी येथे होत्या. कंपनीचे मुख्य संचालक समीर नार्वेकर आणि त्यांची पत्नी नेहा नार्वेकर हे प्रकरणातील मुख्य आरोपी मानले जात आहेत.

चिपळूण शाखेतील फसवणुकीत कामथे येथील प्रतीक आणि तृप्ती माटे यांनी २८.५ लाख रुपये गुंतवले होते. सुरुवातीला त्यांना मासिक व्याज मिळाले, मात्र नंतर पैसे परत देणे थांबवण्यात आले. या प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखा (EOW) करत असून, समीर नार्वेकर, नेहा नार्वेकर, संकेश घाग आणि सिद्धेश कदम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील जांब रोड भागात गजेंद्र श्रावणजी गणवीर यांनी २९ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यांनाही काही महिन्यांनंतर परतावा मिळणे थांबले. या प्रकरणात सागर मयलवार (शाखा व्यवस्थापक) आणि सुरज माडगुळवार (लेखापाल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपासात या प्रकरणातील फसवणुकीची रक्कम तीन कोटींहून अधिक असल्याचे समोर आले आहे.

पुण्यातील कर्वेनगर पोलिस ठाण्यात २ ऑक्टोबर २०२५ रोजी मोठा गुन्हा दाखल झाला. या ठिकाणी TWJ कंपनीच्या २३ प्रतिनिधी विरुद्ध एफ आय आर नोंदवण्यात आला असून, या फसवणुकीची रक्कम तब्बल ६ कोटी १० लाख २८ हजार ७६० रुपये इतकी आहे. आरोपींमध्ये समीर नार्वेकर, नेहा नार्वेकर, प्रतिक जासतकर, रोहित मस्के, मुनाफ मुकादम, स्वप्निल पवार, किरण कुंडले, सुरज सँकासने, संकेश घाग, सिद्धेश पाटील, अविनाश कदम, सचिन पाटील, देवा घाणेकर, सौरभ गोरडे, स्वप्निल देवळे, प्रसन्ना मंगेश करंदीकर यांचा समावेश आहे.

दरम्यान, NSE (National Stock Exchange) ने २०२४ मध्येच TWJ कंपनीशी संबंधित काही व्यक्तींविरुद्ध गुंतवणूकदारांना सावधगिरीचा इशारा दिला होता. समीर नार्वेकर, नेहा नार्वेकर आणी स्वराज टाकले ही नावे ‘अनधिकृत इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायजर’ म्हणून NSE च्या नोटिशीत नमूद होती. तरीदेखील, महाराष्ट्रासह अन्य राज्यांत या कंपनीने गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा दाखवून आपले जाळे पसरवले.

या प्रकरणाला “टोरेस” घोटाळ्यानंतर महाराष्ट्रातील दुसरा सर्वात मोठा आर्थिक फसवणूक प्रकरण मानले जात आहे. सुमारे १२०० कोटीचा घोटाळा असल्याचे बोलले जात आहे. EOW, सायबर सेल आणि स्थानिक पोलीस यांच्या संयुक्त तपासाद्वारे आरोपींवर कारवाई सुरू आहे. काही आरोपी फरार असल्याचे समजते, तर काहींना अटक करून चौकशी सुरु आहे.

गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल करताना त्यांच्या पेमेंट रिसीट्स, बँक ट्रान्झॅक्शन आणि डिजिटल पुरावे सादर केले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावरून एकत्र येत “TWJ Victims Group” स्थापन केले असून न्यायासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे की अशा “हाय रिटर्न” किंवा “कमी वेळेत दुप्पट नफा” देणाऱ्या स्कीम्स पासून दूर राहावे. SEBI अथवा RBI कडून परवाना नसलेल्या कंपन्यांवर विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते.

TWJ घोटाळ्यामुळे कोकणासह महाराष्ट्रातील हजारो गुंतवणूकदार आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेकांचे आयुष्यभराचे साठवलेले पैसे बुडाले असून, काहींनी मानसिक तणावामुळे वैद्यकीय उपचार घेतल्याचेही सांगितले जाते. न्यायालयीन प्रक्रिया आणि पोलिस तपास पुढे कसा वळतो, आरोपींवर कोणती कारवाई होते आणि गुंतवणूकदारांना काही दिलासा मिळतो का, याकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे.

2
847 views