logo

वस्त्रनगरीत इचलकरंजी खूनी हल्ल्यासारख्या प्रकारात वाढ



कोयता,चाकूचा सर्रास वापर, अल्पवयीन युवकांचा सहभाग चिंतनीय
इचलकरंजी, शहर परिसरात गेल्या काही दिवसापासून क्षुल्लक कारणावरून थेट प्राणघातक हल्ल्यासारख्या घटना सातत्याने घडत आहेत. कोयता, चाकूसारख्या धारदार शस्त्राचा वापर सर्रासपणे केल्याचे दिसून येत आहे. हल्ल्यामध्ये अल्पवयीन युवकांचा सहभाग चिंतेचा विषय ठरत आहे. भरदिवसा व गर्दीच्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. तेव्हा वारंवार घडणारे हल्ले कशा पध्दतीने रोखता येईल यासाठी पोलीस विभागाने कडक पाऊले उचलण्याची गरज आहे.

वस्त्रनगरी म्हणून ओळख असलेल्या इचलकरंजीचा विस्तार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. उद्योगधंद्याच्या निमित्ताने देशातील विविध राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले अनेक कुटुंब स्थानिक झाले आहेत. तर शहर परिसरात कामगार वर्गाची संख्या लक्षणिय आहे. त्यामुळे काही कमी जास्त प्रमाणात गुन्हयांचे प्रमाण आहे. मात्र, गेल्या काही दिवसापासून इचलकरंजी शहरासह कबनूर, कोरोची, खोतवाडी आदि ग्रामीण भागात देखील क्षुल्लक कारणावरून थेट रक्तरंजित हिंसा पाहायला मिळत आहे. नागरिकांमधील सहनशिलता लयास गेल्याचे दिसून येत आहे. संवादाऐवजी हातात धारदार शस्त्रे घेण्याची विकृती वाढत चालली आहे. काही प्रकरणात अल्पवयीन मुलाचा सहभाग ही चिंतेची बाब आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सलग झालेल्या खूनी हल्ल्यामुळे शहर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांमधून समाजातील वाढते असंतूलन, वैयक्तिक मतभेद, कौटुंबिक राग, नाजूक संबंध अशा विविध कारणातून थेट जीवघेणा हल्ल्याचे प्रकार वाढत चालले आहेत. अशा प्रकारामुळे केवळ गुन्हेगारी न वाढता सामाजिक संतूलन व कायदा -सुव्यवस्थेवरील विश्वास यांचे आव्हान बनले आहे. तेव्हा पोलीस विभागाने कोणाचीही मुलाहिजा न ठेवता कडक कारवाई करून गुन्हेगारांवर जरब बसविणे गरजेचे आहे, असे जाणकारातून बोलले जात आहे.
गेल्या काही दिवसामध्ये इचलकरंजी, कबनूर, खोतवाडी, कोरोचीमध्ये खुनी हल्ल्याच्या तब्बल चार घटना घडल्या. त्यामध्ये सर्रास कोयता, चाकू सारख्या हत्याराचा वापर करणेत आला. याप्रकरणी गावभाग, शिवाजीनगर, शहापूर पोलीसात गुन्हा दाखल करणेत आला आहे.
➖➖➖➖➖➖➖

➖➖➖➖➖➖➖

0
0 views