
महाराष्ट्रात अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू..
राज्यातील २४६ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार आहेत. यामधून ६,८४९ सदस्यांची व २८८ अध्यक्षांची निवड होणार आहे. यंदा १० नव्या नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. तर, २३६ नगर परिषदांची मुदत संपली आहे. तसेच राज्यातील ४७ पैकी पाच नगर पंचायतींची मुदत अद्याप संपलेली नाही. तर उर्वरित ४२ नगरपंचायतींची निवडणूक होणार आहे. यापैकी २७ नगर पंतायतींची मुदत संपली असून १५ नव्या नगरपंचायतींची वाढ झाली आहे.
अर्ज दाखल करण्यास सुरुवात – १० नोव्हेंबर २०२५
अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत – १७ नोव्हेंबर २०२५
अर्जांची छाननी – १८ नोव्हेंबर २०२५
अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत – २१ नोव्हेंबर २०२५
निवडणूक चिन्ह व उमेदवारांची अंतिम यादी – २६ नोव्हेंबर २०२५
मतदान – २ डिसेंबर २०२५
मतमोजणी – ३ डिसेंबर २०२५
गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा महाराष्ट्रभरातील मतदारांना लागून राहिली होती, तो कार्यक्रम अखेर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यभरात नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी निवडणूक होईल तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हापरिषद व महानगर पालिकांसाठीच्या कार्यक्रमाची घोषणा केली जाईल.
राज्य निवडणूक आयोगाने आज नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठीच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकीसाठी एकूण १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार मतदान करणार आहेत. मतदार याद्यांमध्ये दुबार नावे आढळू नयेत म्हणून आयोगाने “स्टार चिन्ह” लावून तपासणी सुरू केली आहे.
दरम्यान, या घोषणेमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात उत्साह आणि चुरस दोन्ही वाढले आहेत. आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कोणत्या पक्षाचा “नगर विजय” मोर्चा फडकेल?