logo

शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वंदे मातरमचे सामूहिक गायन

वंदे मातरम सार्धशताब्दी

यवतमाळ:- बंकीमचंद्र चटर्जी लिखित ऐतिहासिक “वंदे मातरम” काव्यास १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने “वंदे मातरम” सार्धशताब्दी महोत्सव यवतमाळ जिल्हा क्रीडा संकुल येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी विकास मीना होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन बाबाजी दाते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाला. त्यानंतर सकाळी “वंदे मातरम” सामूहिक गीतगायन करण्यात आले. या गीतगायनात बाबाजी दाते कला व वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ यांच्या संगीत विभागातील २० प्रतिनिधींचा सहभाग होता.

प्रारंभी पोलीस बँड पथकाने स्वागत गीत सादर करून वातावरण देशभक्तीने भारावले. शासकीय आयटीआय यवतमाळचे प्राचार्य विनोद नागोरे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर आयटीआय विद्यार्थ्यांनी “वंदे मातरम” विषयावर आधारित प्रभावी पथनाट्य सादर केले. या पथनाट्याचे दिग्दर्शन अमर विहीरे व पियुष घोडमारे यांनी केले.प्रमुख वक्ते म्हणून बाबाजी दाते वाणिज्य महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख ताराचंद कंठाळे यांनी देशप्रेमाचे महत्त्व आपल्या प्रभावी भाषणातून मांडले.

या प्रसंगी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी उपस्थित नागरिकांना मतदानाची शपथ देत मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले. जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी आपल्या मनोगतातून युवकांना अराजकता आणि समाजविघातक प्रवृत्तींपासून दूर राहून राष्ट्रनिर्माणात सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार डॉ. योगेश देशमुख, कला व वाणिज्य न्यासचे विनायकराव दाते, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी दयानंद सिडाम, श्री. कोडापे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार श्री. दयानंद सिडाम यांनी मानले, तर सूत्रसंचालन श्री. अनिल पिंगळे यांनी केले. शेवटी पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीताची धून वाजवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या महोत्सवाचे यशस्वी आयोजन बाबाजी दाते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ, तालुका प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच बाबाजी दाते कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त सहकार्याने करण्यात आले.

12
1926 views