logo

मुकूटबन भुईकोट दरम्यान असलेली बीएस ईसपात कंपनी गेट समोर कामगारांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन सुरू केले आहे.

झरी रुईकोट आणि मुकूटबन दरम्यान असलेल्या बी.एस. इस्पात (B.S. Ispat) कोळसा खाण कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आज सोमवार, 10 नोव्हेंबर 2025 रोजी जुन्या स्थानिक कामगारांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी तीव्र आंदोलन सुरू केले आहे. कंपनीने दीड वर्षांपूर्वी बंद पडलेल्या खाणीचे काम पुन्हा सुरू केले असताना, जुन्या स्थानिक कामगारांना कामावर रुजू करून न घेता बाहेरील कामगारांना प्राधान्य दिल्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
आंदोलक कामगारांनी कंपनी प्रशासनासमोर खालील दोन प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. जुन्या कामगारांना तात्काळ कामावर रुजू करण्यात यावे. मागील दीड वर्षांच्या बंद काळात जुन्या कामगारांच्या खात्यात जमा न झालेला थकीत पी.एफ. तात्काळ जमा करण्यात यावा. बी.एस. इस्पात कोळसा खाण कंपनी मागील दीड वर्षांपासून बंद होती. या काळात, कंपनीतील स्थानिक जुन्या कामगारांच्या हक्काचा भविष्य निर्वाह निधी अद्यापपर्यंत त्यांच्या वैयक्तिक खात्यात जमा करण्यात आलेला नाही. कामगारांनी या संदर्भात कंपनी प्रशासनाकडे अनेक वेळा लेखी आणि तोंडी मागणी केली, परंतु कंपनी प्रशासनाने या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे, असा आंदोलकांचा आरोप आहे.
आता कंपनीचे काम पुन्हा सुरू झाले असताना, स्थानिक जुन्या अनुभवी कामगारांना कामावर न घेता, कंपनी बाहेरील नवीन कामगारांची भरती करत आहे. यामुळे स्थानिक जुन्या कामगारांवर थेट बेरोजगारीची गदा आली असून, त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. कंपनीचा हा निर्णय स्थानिक कामगारांच्या हक्कांवर अतिक्रमण करणारा असल्यामुळे, न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
या संदर्भात कंपनी प्रशासनाशी संपर्क केला असता प्रतीसाद मिळाला नाही त्यामुळे कंपनी प्रशासनाची बाजू अद्याप कळू शकलेली नाही.

6
224 views