logo

सर्पदंशामुळे तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ....

उपचार व रुग्णवाहिका सुविधेअभावी जीवितहानी.

ठाणे जिल्हा (ता. कल्याण):
कल्याण तालुक्यातील घोटसई (पो. टिटवाला) येथे शनिवार, दि. ५ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री सुमारे ९.१५ वाजता सर्पदंशामुळे निलेश बाळाराम मगर (वय २५ वर्षे) या तरुणाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निलेश मगर हे रात्री साप्ताहिक बैठकीस उपस्थित असताना लघुशंकेसाठी बाहेर गेले होते. त्या वेळी दबा धरून बसलेल्या विषारी नाग सर्पाने त्यांच्या उजव्या हाताच्या करंगळीवर दंश केला. तत्काळ त्यांना ग्रामीण रुग्णालय, गोवेली येथे नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रतिसर्पविष सीरम (ASV) इंजेक्शन देऊन पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.

परंतु १०८ रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध न झाल्याने रुग्ण हलविण्यास विलंब झाला. अखेर खाजगी वाहनाद्वारे निलेश यांना उल्हासनगर जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान रात्री सुमारे ११.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे घोटसई गावात शोककळा पसरली आहे. मृत निलेश यांच्या पश्चात आई-वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच निसर्ग विज्ञान संस्था, डोंबिवली चे कार्यकर्ते श्री. प्रवीण भास्कर भालेराव व श्री. वैभव पद्माकर कुलकर्णी यांनी घटनास्थळी जाऊन कुटुंबीयांची भेट घेऊन शोक व्यक्त केला.

ही घटना ग्रामीण भागात सर्पदंशानंतर तातडीच्या उपचारांची आणि रुग्णवाहिका सेवांची अत्यंत गरज अधोरेखित करते. संबंधित प्रशासनाने अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे.

निसर्ग विज्ञान संस्था, डोंबिवली
(सर्पदंश व विंचूदंश जनजागृती, बचाव आणि संशोधन कार्यासाठी कार्यरत स्वयंसेवी संस्था)
📞 संपर्क : — ९८६९६३५५५८
📧 ई-मेल : —
nisarga.vidnyan@gmail.com

https://youtu.be/2KWIJE4lf80?si=6ywD4M-vEA-UUr0J

339
14133 views