logo

आळंदी-दिघी रस्त्यावर धक्कादायक घटना; मित्रानेच मित्राची गोळी झाडून हत्या

आळंदी-दिघी रस्त्यावर धक्कादायक घटना; मित्रानेच मित्राची गोळी झाडून हत्या
आळंदी-दिघी रस्त्यावर बुधवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. अलंकापुरम चौकाजवळ मित्रानेच मित्राच्या डोक्यात गोळी झाडून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारात ३७ वर्षीय नितीन शंकर गिलबिले यांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान अलंकापुरम ९० फुटी रोडवरील ‘श्री साई रोड कॅरिअर’ कार्यालयाजवळ घडली. काळ्या रंगाच्या फॉर्च्यूनर गाडीत तिघे मित्र बसलेले असताना अचानक वाद निर्माण झाला आणि त्यातून संशयित अमित जीवन पठारे (रा. पठार मळा) आणि विक्रांत ठाकूर (रा. सोलू खेड) यांनी नितीन गिलबिले यांच्यावर गोळीबार केला.
गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या नितीन गिलबिले यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीनुसार, नितीन गिलबिले, अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर हे तिघेही जिवलग मित्र होते. हे तिघे जमिनांच्या प्लॉटिंगच्या व्यवसायात एकत्र होते. व्यवसायातील व्यवहारांच्या वादातून ही घटना घडली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
घटनेनंतर अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर दोघेही फरार झाले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. दिघी पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

31
2475 views