logo

इलेक्ट्रॉनिक माध्यमांव्दारे प्रसारीत करण्यात येणाऱ्या*


*जाहिरातींचे प्रमाणीकरण करणे आवश्यक*

*निवडणूक जाहिरात प्रमाणीकरणासाठी समिती*

नांदेड, दि. 25 नोव्हेंबर :- नगर परिषद व नगरपंचायतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुक्त, निर्भय, पारदर्शक आणि प्रत्येक राजकीय पक्ष व उमेदवाराला समान संधी मिळावी यासाठी राज्य निवडणूक आयोगाने माध्यम क्षेत्रातील सर्व नियमांचे काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने व्यापक मार्गदर्शक सूचना आणि जाहिरातीतील आचारसंहितेचे पालन बंधनकारक करण्यासाठी जिल्हा व राज्यस्तरावर माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समित्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली आहे. उमेदवारांमार्फत प्रचारासाठी इलेक्ट्रॉनिक / सोशल मिडीयास देण्यात येणाऱ्या जाहिरांतीचे पूर्व प्रमाणिकरण या समितीमार्फत केल्या जाते.

महाराष्ट्र शासनाच्या 9 ऑक्टोबर 2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रसारित/प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक विषयक प्रस्तावित जाहिरातींचे प्रसारमाध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीकडून पूर्व प्रमाणन करून घेणे आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये दूरदर्शन, उपग्रह वाहिन्या, केबल वाहिन्या, यूट्यूब वाहिन्या, केबल नेटवर्क, आकाशवाणी, खासगी एफएम वाहिन्या, चित्रपटगृह, सार्वजनिक ठिकाणचे दृकश्राव्य फलक (ऑडीओ व्हिज्युअल डिसप्ले), ई-वृत्तपत्रे, बल्क एसएमएस, व्हाइस एसएमएस, समाजमाध्यमे, संकेतस्थळे आदींचा समावेश होतो.

मुद्रित माध्यमांद्वारे प्रसिध्द करावयाच्या जाहिरातींचे पूर्वप्रमाणन करण्याची आवश्यकता नाही. परंतु, अशा माध्यमातून जाहिरातील प्रसिध्द करताना आचारसंहिता किंवा कोणत्याही कायद्याचे उल्लंघन होता कामा नये. तसेच, इतर प्रत्येक मुद्रित साहित्यावर प्रकाशक, मुद्रणालय, पत्ता, प्रत क्रमांक आणि प्रत संख्या नमूद असणे बंधनकारक आहे. उल्लंघन आढळल्यास प्रेस अॅक्टसह लागू प्रचलित कायद्यांनुसार कारवाई होईल. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, समाजमाध्यमे आदी माध्यमाद्वारे कोणत्याही प्रचारविषयक जाहिराती देता येणार नाहीत.

अर्जाचा नमुना व आवश्यक माहिती जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड, पार्वती निवास, खुरसाळे हॉस्पिटल, यात्री निवास रोड, बडपूरा नांदेड येथून उपलब्ध करून घेता येईल. अर्जासोबत जाहिरातींची इलेक्ट्रॉनिक स्वरुपातील प्रत (पेनड्राईव्ह) आणि साक्षांकित जाहिरात संहिता जोडणे बंधनकारक आहे. जाहिरातींची कोणतीही देयके धनादेश, धनाकर्ष ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात येतील. अन्य भाषांतील जाहिरातींसाठी मराठी अनुवादित साक्षांकित केलेली प्रत व नोटराईज्ड अनुवाद प्रत जोडणे आवश्यक आहे.

7
711 views