
२४ तास पाणी, खड्डेमुक्त रस्ते, आकर्षक बगीचे आणी स्वच्छतेला प्राधान्य भाजपाचा पाच कलमी निर्धार : आमदार राणाजगजितसिंह पाटील
(जिल्हा प्रतिनिधी विकास वाघ धाराशिव)
कधीकाळी १०० टँकरने ज्या धाराशिव शहराला पाणी आणावे लागले. त्याच शहरासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या मदतीने उजनी पाणी पुरवठा योजना यशस्वी केली. आता यापुढे २४ तास स्वच्छ आणि मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याचा आपला निर्धार आहे. त्याचबरोबर शहरातील विविध ठिकाणी २५ कोटींपेक्षा अधिकचा निधी वापरून आकर्षक बागबगीचे आणि वृक्षलागवड करण्याचा आपला मानस आहे. त्यामुळे पुढील काळात धाराशिव हे मुबलक पाणी आणि बागबगीचे असलेले सुंदर शहर म्हणून सगळीकडे ओळखले जाईल, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठान भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार पाटील यांनी भाजपाचा पाच कलमी कार्यक्रम जाहीर केला. धाराशिव शहरातील प्रत्येक मतदारांपर्यंत आपण पोहोचलो आहोत. त्यांच्यासोबत चर्चा करून अडीअडचणी जाणून घेतल्या. सर्वसामान्य मतदारांनी केलेल्या सूचनांपैकी अनेक महत्वपूर्ण सूचनांचा जाहीरनाम्यात समावेश केला आहे. मात्र त्यातील प्रमुख पाच गोष्टींवर आपला भर असणार आहे. हे पाच विषय तातडीने मार्गी लावण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे आमदार पाटील यांनी यावेळी नमुद केले.
शहराला २४ तास स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्याचा आपला निर्धार आहे. त्याचबरोबर रस्ते, नाली आणि विद्युत व्यवस्थेकडे प्राधान्याने लक्ष दिले जाणार आहे. पुढील पाच वर्षांत त्यासाठी ३०० कोटी रूपये उपलब्ध व्हावेत, असे आपले प्रयत्न आहेत. त्यासोबतच साफसफाई आणि कचरा संकलन यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. अद्ययावत यंत्रसामग्री आणून कचरा संकलन आणि दररोज त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे कचर्याचे डोंगर यापुढे शिल्लक राहणार नाहीत. असेही त्यांनी नमुद केले. शहरात दोन ठिकाणी प्रत्येकी चार कोटी रूपयांची उद्याने मंजूर आहेत. आणखी एक नमो उद्यान आपल्याला मिळाले आहे. साधारणपणे २५ कोटी रूपयांच्या माध्यमातून शहरात आकर्षक उद्याने आणि वृक्ष लागवड करण्याचा भाजपाने निर्धार केला असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.
प्रशासनातील अनेक असुविधा दूर करण्यासाठी, त्यात पारदर्शकता आणण्यासाठी आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्य सरकार गतीमान करण्यासाठी जे तंत्रज्ञान वापरतात, त्याचा अंमल पालिका स्तरावर केला जाणार आहे. जेणेकरून व्हॉट्सअपच्या माध्यमातून नागरिक आपल्या तक्रारी दाखल करू शकतील. शक्यतो नागरिकांना पालिकेत येण्याची गरजच भासणार नाही, असे आपले प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी नमुद केले. यापूर्वी अनेक ऐतिहासिक विकासकामे आपण केली आहेत. ते करण्याची क्षमता केवळ आपल्यामध्ये आहे. तसा आपल्या शहराचा इतिहास आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी या पाच कलमी कार्यक्रमांव्यतिरिक्त आवश्यक असलेल्या अनेक बाबी उपलब्ध करून देण्याचाही आपला प्रयत्न असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी धाराशिव नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नेहा राहुल काकडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नेताजी पाटील,माजी नगराध्यक्ष मधुकरराव तावडे,संपतराव डोके, सुनील काकडे,यांच्यासह युवराज नळे,नितीन भोसले आदी उपस्थित होते.