संविधान दिवस उत्साहात साजरा
जळगाव (प्रतिनिधी) :कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आंतरविद्याशाखीय अभ्यास प्रशाळे अंतर्गत शिक्षणशास्त्र विभागात आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाचे शिल्पकार भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांनी एकजुटीने संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून वचनबद्धता व्यक्त केली.कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. संतोष खराडे यांनी संविधानाचे महत्त्व, मूलभूत अधिकार-कर्तव्ये आणि संवैधानिक मूल्यांची आजच्या काळातील उपयुक्तता याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.प्रमुख पाहुण्या प्राचार्य डॉ. जयश्री नेमाडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडताना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि संविधाननिर्मितीतील योगदानाचा सखोल आढावा घेतला. विशेषतः महिलांसाठी डॉ. आंबेडकरांनी केलेल्या क्रांतिकारी कार्याचा उल्लेख करताना स्त्री-पुरुष समानता, शिक्षणाच्या संधी, संपत्तीवरील अधिकार आणि विवाह–घटस्फोटातील न्याय्य तरतुदींचा इतिहास त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला.समारोप अध्यक्ष डॉ. मनिषा इंदानी यांनी केला. त्यांनी विद्यार्थ्यांनी लोकतांत्रिक मूल्यांचा अंगीकार करून जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन केले तसेच समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या संविधानातील मूलभूत स्तंभांचे महत्त्व स्पष्ट केले. समाजातील विविधता आणि सहकार्याची गरज यावर त्यांनी भर दिला.समारोपाच्या वेळी २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दोन मिनिटे मौन पाळून त्यांच्या साहस आणि राष्ट्रनिष्ठेचे स्मरण करण्यात आले.या प्रसंगी डॉ. स्वाती तायडे, डॉ. रणजीत पारधे, श्री. योगेश कोरडेवाड यांसह विभागातील शिक्षकेत्तर कर्मचारी जयेश पाटील, विवेक भावसार आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.