logo

“वानर-माकड पकडा आणि 600 रुपये मिळवा” — कोकणात माकडांचा उचापतीला लगाम लावण्यासाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय; वन विभागाची मोहीम सुरू

कोकणात गेल्या काही वर्षांत माकडांचा उपद्रव चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. शेतांतील भाजीपाला, फळबागा, नारळ-आंबा उत्पादनावर मोठ्या प्रमाणात हानी पोहोचत असून काही भागांत माकडांच्या हल्ल्यांचेही प्रकार समोर येत आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आणखी रायगड जिल्ह्यातील ग्रामस्थ त्रस्त असून प्रशासनावर कारवाईची मागणी वाढत असताना राज्य सरकारने अखेर मोठा निर्णय घेतला आहे.

वन विभागाने २५ नोव्हेंबर रोजी काढलेल्या आदेशानुसार कोकणभर माकड पकड मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवली जाणार आहे. विशेष म्हणजे पकडलेल्या प्रत्येक माकडावर आता 600 रुपये प्रोत्साहन रक्कम शासनाकडून दिली जाणार आहे. तर पकड कामात सहभागी पथकाला अतिरिक्त 1,000 रुपयांपर्यंत प्रवास व भत्ता उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. शासनाच्या महसूल व वन विभागाने जारी केलेल्या कार्यपद्धतीनुसार 10 माकडे पकडल्यास प्रति माकड 600 रुपये या हिशोबाने निधी दिला जाणार आहे.

वन विभागाच्या प्रशिक्षित पथकांची गावनिहाय आणि शहरांमध्ये नियुक्ती केली जाणार असून प्रत्येक पकडलेल्या प्राण्याची नोंद घेऊन त्याचे सुरक्षित पुनर्वसन केले जाणार आहे. माकडांना अवैधपणे इजा करणे, त्रास देणे किंवा विक्री करण्यास कडक मनाई असेल.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “माकडांची संख्यावाढ अनियंत्रित होत आहे आणि त्यामुळे परिसंस्थेचा समतोल बिघडतो आहे. म्हणून वैज्ञानिक पद्धतीने पकड आणि पुनर्वसन आवश्यक झाले आहे. या मोहिमेमुळे कृषी व घरगुती नुकसान मोठ्या प्रमाणावर कमी होईल.”

ग्रामस्थ व शेतकरी वर्गाने सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले असून मोहीम प्रभावीपणे राबवली गेल्यास उपद्रव मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

6
478 views