logo

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने १ लाख दिव्यांगांना कृत्रिम अवयव वितरण*



*दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आयुष्य जगण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न*

मुंबई, दि. २७ : राज्यात दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आयुष्य जगण्यासाठी सर्व सुविधा मिळवून देण्याकरिता शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न आहेत. समाजातील सर्व घटकांना समान संधी उपलब्ध करून देण्याचे शासनाचे ध्येय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने व रतननिधी फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यक साधन वितरण शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. या उपक्रमाद्वारे १ लाख दिव्यांग व्यक्तींना लाभ देण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून, हा अभिनव प्रकल्प दिव्यांग पुनर्वसनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असून, स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने त्यासाठी अधिक प्रभावी कार्यवाही केली जात आहे . या उपक्रमाचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करणे हा आहे. कृत्रिम हात, पाय, श्रवणयंत्रे, व्हीलचेअर्स आणि इतर सहाय्यक उपकरणे यांचा समावेश असलेला हा वितरण कार्यक्रम राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत आहे. रतननिधी फाऊंडेशनने राज्यातील बीड, चंद्रपूर, जळगाव, सोलापूर, पालघर, मुंबई, गडचिरोली, पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अकोला, परभणी, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये २९,४९६ सहाय्यक साधनांचे (जयपूर फूट, पोलिओ कॅलिपर्स, कृत्रिम हात व काठी) वितरण करून सुमारे २६ हजार दिव्यांग व्यक्तींचे पुनर्वसन केले आहे.

जागतिक स्तरावर सुमारे १५ टक्के लोकसंख्या दिव्यांग आहे, तर भारतात हा आकडा सुमारे २.२ टक्के आहे. या पार्श्वभूमीवर रतननिधी फाऊंडेशनचा मोबिलिटी प्रकल्प दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आयुष्य जगण्याची उर्मी देणारा, आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.

10
433 views