logo

महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत कर्नाटकची नौका पकडली — ७ खलाशांसह नौका जप्त ; १५ दिवसांत परप्रांतीय नौकांवर दुसरी सलग धडक कारवाई

महाराष्ट्राच्या सागरी मत्स्य व्यवसाय क्षेत्राचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने मत्स्य व्यवसाय विभाग सतत सजग असून, परप्रांतीय नौकांद्वारे होणारी अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच मोहिमेअंतर्गत मंगळवार, २५ नोव्हेंबर रोजी सकाळच्या पहाटेच महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या कर्नाटक राज्यातील एका नौकेवर धडक कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे ३:४५ च्या सुमारास नियमित गस्तीदरम्यान आचरासमोर सुमारे १४ वाव सागरी अंतरावर संशयास्पद हालचाल आढळून आली. त्यावर त्वरित कारवाई करत पथकाने IND-KA-02-MM-4523 क्रमांकाची नौका ताब्यात घेतली. ही नौका राजाधगिरी दिवाकर कलमाडी, रा. कलमाडी, उडुपी, जि. मलप्पी (कर्नाटक) यांच्या मालकीची असल्याचे तपासात स्पष्ट झाले. नौकेवर कोणताही वैध परवाना नसताना ट्रॉलिंगद्वारे मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जात असल्याचे निदर्शनास आले.

यावेळी नौकेवर तांडेलसह एकूण ७ खलाशी उपस्थित होते. पथकाने नौका ताब्यात घेऊन ती सुरक्षितपणे देवगड बंदरात आणली. नौकेवर आढळलेला मासळीचा साठा शासकीय नियम पाळून लिलाव प्रक्रियेसाठी हस्तांतरित करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आलेला असून, तो सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात सादर करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. आगामी न्यायालयीन सुनावणीनंतर संबंधित नौकामालक व खलाशांवर कायदेशीर कारवाई होणार आहे.

ही कारवाई किरण वाघमारे, अंमलबजावणी अधिकारी तथा सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, देवगड) यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या कारवाईमध्ये देवगड पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांसह सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व रक्षक टुकरुल, खवळे, फाटक, बांधकर, कुबल व सावजी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संपूर्ण ऑपरेशन सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय, सिंधुदुर्ग सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.

कर्नाटकच्या नौकेवर झालेली ही कारवाई मागील १५ दिवसांत झालेल्या दुसऱ्या मोठ्या ऑपरेशनची नोंद आहे. याआधीही अशाच प्रकारे परप्रांतीय नौकांकडून महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदा मासेमारी होत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मत्स्य विभागाने कारवाई करून नौका जप्त केल्या होत्या. त्यामुळे राज्याच्या सागरी हद्दीत अनधिकृत मासेमारी करून मत्स्य संपत्तीला धोका निर्माण करणाऱ्यांना कडक संदेश देण्यात मत्स्य विभाग पुन्हा एकदा यशस्वी ठरला आहे.

4
81 views