logo

डॉ. ललिता गावडे यांची अध्यक्षपदी निवड – दुर्गा मंचाच्या नेतृत्वाला पशुवैद्यक बांधवांचा उत्स्फूर्त पाठिंबा

सोनगाव प्रतिनिधी : महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटनेच्या निवडणुकीत राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथील बाबासाहेब गावडे यांची कन्या डॉ. ललिता गावडे यांनी पुन्हा एकदा प्रभावी कामगिरी करत विजयी होत दुर्गा मंचाच्या नेतृत्वाची ताकद अधोरेखित केली आहे. पशुवैद्यक बांधव आणि भगिनींनी दाखवलेल्या उत्स्फूर्त पाठिंब्यामुळेच हा विजय शक्य झाल्याचे त्यांनी कृतज्ञतेने नमूद केले.

विजयानंतर प्रतिक्रिया देताना डॉ. गावडे म्हणाल्या, “लोकशाही हा उत्सव आहे. या उत्सवात प्रत्येक सदस्याने सहभाग नोंदवून आपला मौल्यवान मताधिकार बजावला. सदस्यांनी दाखवलेल्या विश्वास, प्रेम आणि सहकार्यामुळेच माझे कार्य अधिक सक्षम होणार आहे.”

निवड प्रक्रियेला मिळालेला उत्स्फूर्त आणि शिस्तबद्ध प्रतिसाद हा संघटनेच्या सक्षम लोकशाही संस्कृतीचा उत्तम नमुना असल्याचेही त्यांनी सांगितले.

नव्या कार्यकारिणीच्या कार्यधोरणाबद्दल बोलताना डॉ. गावडे यांनी पशुवैद्यक क्षेत्रातील सेवाभाव, कर्तव्यनिष्ठा आणि व्यावसायिक शिस्त अधिक मजबूत करण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचे स्पष्ट केले. संघटनेचे कामकाज अधिक पारदर्शक ठेवणे, सदस्यांच्या अडचणी तातडीने सोडविणे, तसेच संघटनात्मक बळ वाढविणे हे येणाऱ्या काळातील प्रमुख प्राधान्यक्रम असतील.

यापुढील कार्यकाळात महिलांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन, ग्रामीण भागातील पशुपालकांना सुधारित पशुवैद्यक सेवा उपलब्ध करून देणे आणि युवा पशुवैद्यकांना मार्गदर्शन देणे या महत्त्वाच्या उपक्रमांवर दुर्गा मंच लक्ष केंद्रीत करणार आहे.

डॉ. ललिता गावडे पुढे म्हणाल्या, “आपले सहकार्य, प्रेम आणि पाठिंबा हेच माझ्या कार्याची खरी प्रेरणा आहे. दुर्गा मंच आणि संपूर्ण संघटना अधिक प्रभावी, सदस्यकेंद्रित व सक्षम करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन.”

डॉ. गावडे यांच्या निवडीनंतर संघटनेत उत्साहाचे वातावरण असून नव्या नेतृत्वाकडून कार्यपद्धतीत नवी दिशा, सकारात्मक बदल आणि अधिक प्रभावी कामकाज अपेक्षित असल्याचे पशुवैद्यक बांधवांकडून व्यक्त होत आहे.

13
1268 views