logo

घारगांव ता. संगमनेर येथील मुळा नदीचे पुलावरुन फेकलेल्या ०३ महिने वय असलेल्या शिवांशचे मारेकरी जेरबंद, आई वडिलांनीच खुन करुन प्रेताची विल्हेवाट लावली

प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक ४/१२/२०२५ रोजी सकाळी ०९.१६ वा. चे सुमारास आंबीखालसा येथील राहिवासी श्री अशोक धोंडीराम माळी यांना मुळा नदीचे पुलाखाली काटेरी झुडुपामध्ये एक अंदाजे ०३ ते ०४ महिने वय असलेल्या बालकाचा मृतदेह दिसून आल्याने त्यांनी दिलेल्या खबरीवरुन घारगांव पोलीस ठाणे अकस्मात मृत्यु रजि. नंबर ७४/२०२५ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १९४ प्रमाणे अकस्मात मृत्यु दाखल करण्यात आलेला आहे.

सदर अकस्मात मृत्युमधील अनोळखी मयताची ओळख पटविणेकामी पोनि किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपन ि समीर अभंग, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, संतोष खैरे, फुरकान शेख, दिपक घाटकर, राहुल डोके, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डीले, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे यांचे पथक तयार करुन सदर पथकास वर नमुद अकस्मात मृत्युमधील अनोळखी बालकाची ओळख पटविणेकामी पथकास सूचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना करण्यात आले.

पोनि श्री किरणकुमार कबाडी, व वर नमुद पथकाने घटनाठिकाणी भेट देवून घटनाठिकाणची तसेच मयत बालकाची पाहणी केली असता सदरचा प्रकार हा प्रथमदर्शनी घातपाताचा दिसून आला. पथकाने घटनाठिकाणी बारीक पाहणी करुन घटनाठिकाणी येणारे जाणारे वाहनाचे मार्गाची पाहणी करुन गोपनिय माहिती व व्यवसायीक कौशल्याचे आधारे माहिती काढण्यात आली. सदर माहितीचे आधारे मयत बालकाचे प्रेताची विल्हेवाट लावण्याकरीता वापरण्यात आलेली कार ही आव्हाना, ता. भोकरदन, जि. जालना या ठिकाणावरील असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने भोकरदन परिसरामध्ये जावून प्राथमिक आरोग्य केंद्र, आशा सेविका व गोपनिय माहितीचे आधारे माहिती काढली असता महिला नामे कविता प्रकाश जाधव हिचे नातेवाईकांनी त्यांचे बाळाचे छ. संभाजीनगर या ठिकाणी ऑपरेशन झालेबाबत व त्यास ३ ते ४ दिवसांमध्ये हॉस्पीटलमधुन सोडणार असल्याची अफवा पसरविली असल्याची माहिती प्राप्त झाली.

पथकाने वरील माहितीचे आधारे १) प्रकाश पंडित जाधव वय ३७ वर्षे, रा. भिवपुर, पो. आव्हाणा, ता. भोकरदन, जि. जालना, २) सौ. कविता प्रकाश जाधव वय ३२ वर्षे, रा. सदर, व ३) हरिदास गणेश राठोड वय ३२ वर्षे, रा. आव्हाणा, ता. भोकरदन, जि. जालना यांचेकडे प्राथमिक चौकशी करुन त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांचे वर्तन संशयास्पद वाटल्याने त्यांना स्थानिक गुन्हे शाखा कार्यालय अहिल्यानगर येथे बोलावुन घेवुन त्यांचेकडे सखोल व बारकाईने विचारपुस करता प्रकाश पंडित जाधव याने व त्याची पत्नी कविता प्रकाश जाधव अशांनी त्यांचा मयत मुलगा नामे शिवांश उर्फ देवांश प्रकाश जाधव वय ३ महिने, रा. भिवपुर, पो. आव्हाणा, ता. भोकरदन, जि. जालना यास इसम नामे हरिदास गणेश राठोड याचेकडील इटींगा गाडीमधुन दिनांक ०३/१२/२०२५ रोजी पुणेचे दिशेने घेवुन जावुन घारगांव, ता. संगमनेर परिसरामध्ये एका नदीचे ब्रिजजवळ थांबवुन गाडीचा चालक व प्रकाश पंडित जाधव अशांनी खाली उतरुन त्या ठिकाणी बाळ बरे होणार नसल्याचे कारणावरुन त्यास मारुन फेकुन देण्याचे उद्देशाने जागा शोधून त्यानंतर बाळाचा गळा दाबुन, व त्याचे अंगावरील कपडे काढुन घेवुन त्यास नग्न अवस्थेत नदीचे पुलावरुन खाली फेकुन दिले असल्याचे सांगितले आहे. आरोपीनी गुन्ह्यात वापरलेली ५,००,०००/- रुपये कि. ची इर्टीगा गाडी क्रमांक एम. एच. ०२. ई. एच. ५३५४ हि ताब्यात घेण्यात आलेली आहे.

वरील अकस्मात मृत्युचे तपासामध्ये मयताचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर बाबत घारगांव पोलीस ठाणे गु.र.नं. ३७०/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), २३८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

वरील आरोपींनी मयत शिवांश उर्फ देवांश प्रकाश जाधव वय ३ महिने, रा. भिवपुर, पो. आव्हाणा, ता. भोकरदन, जि. जालना याचा खून करुन त्याचे प्रेताची विल्हेवाट लावल्यानंतर त्यांचे गावामध्ये चर्चा होव नये म्हणून त्यांचे बाळाचे छ. संभाजीनगर या ठिकाणी ऑपरेशन झालेले असून तो छ. संभाजीनगर या ठिकाणी ऍडमिट असल्याचे भासविले तसेच बाळाची आईस गावातील बाळाबाबत लोक विचारतील म्हणुन तिस वेगवेगळ्या ठिकाणी देवदर्शनाकरीता पाठविले असल्याचे निष्पन्न झालेले आहे.

ताब्यातील आरोपींना घारगांव पोलीस ठाणे गु.र.नं. ३७०/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), २३८ प्रमाणे गुन्ह्याचे तपासकामी घारगांव पोलीस ठाणे या ठिकाणी हजर करण्यात आले असून पुढील तपास घारगांव पोलीस ठाणे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

16
1005 views