बोल्हेगांव, एम.आय.डी.सी. येथील महिलेच्या खुनाचे गुन्ह्याची स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर कडुन उकल, चोरीचे उद्देशाने खुन करणाऱ्या ४ युवतींची टोळी
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक १२/१२/२०२५ रोजी मयत नामे मनिषा बाळासाहेब शिंदे वय ४० वर्षे, रा. शनि मंदीराजवळ, कौस्तुभ कॉलनी, भारत बेकरी रोड, बोल्हेगांव, ता. जि. अहिल्यानगर या त्यांचे राहते घरी असतांना कोणीतरी अज्ञात आरोपीने मयताचे घरामध्ये घुसुन मयताचे गळ्यावर काहीतरी धारदार हत्याराने वार करुन तिचा खून केलेला आहे. सदर घटनेबाबत फिर्यादी बाळासाहेब साहेबराव शिंदे वय ४६ वर्षे, रा. शनि मंदीराजवळ, कौस्तुभ कॉलनी, भारत बेकरी रोड, बोल्हेगांव, ता. जि. अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. ११८३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), ३३२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरीलप्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर मा. श्री सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना गुन्ह्यातील अनोळखी आरोपींची माहिती काढुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांनी तात्काळ घटनाठिकाणी भेट देवुन घटनाठिकाणची पाहणी करुन गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि दिपक मेढे, राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, फुरकान शेख, गणेश धोत्रे, शाहिद शेख, अतुल लोटके, दिपक घाटकर, अमृत आढाव, सतीष भवर, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे, छाया माळी, सोनल भाग भागवत यांचे दोन पथके तयार करुन सदर पथकास गुन्हा उघडकीस आणणेकरीता सूचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
वर नमुद पथकाने तात्काळ घटनाठिकाणी भेट देवुन घटनाठिकाणचे आजुबाजुचे परिसराची पाहणी केली. वरील पथक आरोपींची माहिती काढत असतांना व्यवसायीक कौशल्याचे आधारे मिळालेल्या माहितीवरुन सदरचा गुन्हा हा महिला नामे दिव्या अंकुश देशमुख ऊर्फ दिव्या विजय खाडे, रा. भारत बेकरीच्या पाठीमागे, बालाजी नगर, बोल्हेगाव, ता.जि. अहिल्यानगर हिने तिचे इतर साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशिर माहिती प्राप्त झाली. दिनांक १५/१२/२०२५ रोजी महिला नामे १) दिव्या अंकुश देशमुख ऊर्फ दिव्या विजय खाडे, वय २० वर्षे, रा. भारत बेकरीच्या पाठीमागे, बालाजी नगर, बोल्हेगाव, ता. जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगुन सदरचा गुन्हा तिने तिचे साथीदार महिला नामे २) अंजुम ऊर्फ मेहक अहमद सैफी, वय २२ वर्षे, रा. मोरया पार्क, बोल्हेगाव, ता. जि. अहिल्यानगर मुळ रा. ११३, गल्ली नं. एफ ब्लॉक, चांद बाग, करावल नगर, नॉर्थ इस्ट दिल्ली, ३) विधीसंघर्षीत बालिका वय १६ वर्षे, ४) विधीसंघर्षीत बालिका वय १६ वर्षे यांना महिला पोलीस अंमलदार यांचे मार्फतीने ताब्यात घेवुन त्यांचेकडे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता महिला नामे दिव्या देशमुख हिने कळविले की, तिचे माहेर मयत महिलेचे शेजारी असुन तिस मयत महिलेकडे असलेल्या दागिण्यांबाबत माहिती होती. दिव्या देशमुख हिने तिच्या वरील इतर साथीदार यांना बोलावुन घेवुन मयत महिलेच्या घरामध्ये जावुन त्यांनी मयत महिला हिचे गळ्यातील दागिने बळजबरीने काढुन घेत असतांना तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली असता त्यांनी मयत महिलेचे गळ्यावर व हनुवटीवर धारदार शस्त्राने वार करुन तिचा खुन केला असल्याची कबुली दिली आहे.
ताब्यातील महिला आरोपींना तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. ११८३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), ३३२ (अ) प्रमाणे गुन्ह्याचे तपासकामी तोफखाना पोलीस ठाणे या ठिकाणी हजर
करण्यात आले असुन पुढील तपास तोफखाना पोलीस ठाणे हे करीत आहेत. सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर व मा. श्री वैभव कलुबमें, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
राधाकिसन क्षीरसागर
राज्य प्रतिनिधी