logo

विहिरीत विवाहितेचा मृतदेह आढळल्याने खळबळ आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल


डोणगाव प्रतिनिधी : सालार बेग

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीतील माळेगाव येथे दिनांक २३ डिसेंबर रोजी एका विहिरीत विवाहितेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून तिच्या पतीसह सासरच्या कुटुंबातील तीन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बीएनएस कलम ८०, १०८ (३)(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत विवाहितेचे वडील गजानन सिताराम करवते (रा. वाकळवाडी, ता. मालेगाव, जि. वाशिम) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, त्यांची मुलगी साधना हिचा विवाह माळेगाव येथील विष्णू रामभाऊ चौंडकर याच्याशी झाला होता. साधना गर्भवती असताना पती विष्णू चौंडकर व इतर दोन व्यक्तींनी माहेरून दीड लाख रुपये आणण्याची मागणी करत तिला सातत्याने मानसिक त्रास दिला. या छळाला कंटाळून साधनाला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी जानेफळ पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक ४३३ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेनंतर शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मेहकर उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, नायब तहसीलदार नितीन बोरकर, डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमरनाथ नागरे तसेच जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली.
घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेहकर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. सदर प्रकरणात आत्महत्या की घातपात, याबाबतचा सखोल तपास ठाणेदार अजिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

9
216 views