
सबला उत्कर्ष फाउंडेशनतर्फे प्रबोधनाचा जागर; एकदिवसीय शिबिर उत्साहात संपन्न!*
*सबला उत्कर्ष फाउंडेशनतर्फे प्रबोधनाचा जागर; एकदिवसीय शिबिर उत्साहात संपन्न!*
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) —
सबला उत्कर्ष फाउंडेशन पडेगाव, छत्रपती संभाजीनगर जिल्हा युनिटच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन, राष्ट्रसंत गाडगेबाबा स्मृतीदिन तसेच स्त्रीमुक्ती दिनानिमित्त एकदिवसीय प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर रांजणगाव येथील लुंबिनी बुद्ध विहार, रांजणगाव शेणपुंजी, छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात पार पडले.
या प्रबोधन शिबिरात आंबेडकरी चळवळीचे गाढे अभ्यासक संदीप तेंडोलकर आणि प्रगल्भ अभ्यासक पी.यू. बनसोडे गुरुजी यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. त्यांनी सामाजिक समता, स्त्रीमुक्ती, शिक्षणाचे महत्त्व व आत्मनिर्भरतेचे मूल्य यावर सखोल विचार मांडले.
कार्यक्रमाच्या आयोजक व सबला उत्कर्ष फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ. राजश्री राहुल चौधरी यांनी महिलांना संबोधित करताना सांगितले की, लवकरच महिलांसाठी तीन दिवसांचा स्वयंरोजगार विषयक विशेष मार्गदर्शन कार्यक्रम सरकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आयोजित केला जाईल. या उपक्रमांतर्गत ४० महिलांना स्वयंरोजगारासाठी आवश्यक साहित्य व कर्जसुविधेसाठी मदत करण्यात येणार असून, उद्यम आधार नोंदणी करून दिली जाईल. तसेच, तीन दिवसांच्या प्रशिक्षणानंतर सर्व सहभागी महिलांना शासनमान्य स्वयंरोजगार प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे महिलांना स्वतःच्या बळावर रोजगार उभारता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या वेळी कु. जागृती चौधरी (उपाध्यक्ष), निरंजन खैरनार (सचिव व तालुका संयोजक—जोगेश्वरी), श्री राहुल परदेशी (सहसचिव), सौ. आशा निकाले (सदस्य), ॲड. आम्रपाली वाव्हाळे (जिल्हा संयोजक), विलास बाबा गायकवाड (तालुका संयोजक—खुलताबाद), श्री अनिल कुमार तांदळे (जिल्हा संयोजक) यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
एकूणच, या प्रबोधन शिबिराने सामाजिक जागृतीसह महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा ठोस मार्ग दाखवला, अशी प्रतिक्रिया उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.