logo

विद्यार्थ्यांनी स्वतःच्या खर्चातून साजरा केला शिक्षकांचा वाढदिवस — गुरु–शिष्य नात्याचे अनोखे उदाहरण!


डोणगाव प्रतिनिधी सालार बेग

डोणगाव :
जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा डोणगाव येथील इयत्ता चौथी ‘ब’ च्या विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गशिक्षक असलम अली शहा (सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा डोणगाव, पंचायत समिती मेहकर) यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करत गुरु–शिष्य नात्याला उजाळा दिला.
30 डिसेंबर रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांनी स्वतः जमा केलेल्या पैशातून शाळा सजवली, वर्ग रंगवला, फलकावर शुभेच्छा संदेश लिहिले आणि आपल्या आवडत्या शिक्षकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
शिक्षक असलम अली शहा हे शिक्षणप्रेमी, विद्यार्थ्यांसाठी सदैव तत्पर राहणारे, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीकरिता मनापासून मेहनत घेणारे आदर्श गुरु म्हणून ओळखले जातात. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, ज्ञान आणि संस्कार रुजविण्यासाठी ते अहोरात्र परिश्रम घेतात. त्यांच्या कार्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी प्रेम निर्माण झाले असून त्यांना आपल्या शिक्षकांबद्दल अपार आत्मियता आहे, याचे प्रत्यंतर वाढदिवसाच्या कार्यक्रमातून प्रकर्षाने दिसून आले.
वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. छोट्या-छोट्या रकमा जमा करून विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी वाढदिवस साजरा केल्याने हे दृश्य पाहणारे शिक्षकवर्ग आणि पालकही भारावून गेले.
ही घटना गुरुचे स्थान किती श्रेष्ठ आहे आणि शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनात किती महत्त्वाचा व्यक्ती असतो याचा उजवा प्रत्यय देणारी ठरली.

13
651 views