logo

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या ‘शक्तीस्थळा’चे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पिंपळे गुरव (पुणे) येथे लोकार्पण....

(पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाचे शिल्पकार, लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या ‘शक्तीस्थळा’चे लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपळे गुरव (पुणे) येथे पार पडले. हा कार्यक्रम पिंपरी-चिंचवडच्या विकासयात्रेतील भावनिक आणि ऐतिहासिक क्षण ठरला.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “पिंपरी-चिंचवडमध्ये आल्यानंतर लक्ष्मणभाऊंची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांनी उभे केलेले चिरस्थायी कार्य आणि दूरदृष्टीपूर्ण विकासाचे व्हिजन आजही शहराला दिशा देत आहे. हे शक्तीस्थळ कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देणारे केंद्र ठरेल.” औद्योगिकीकरणामुळे वेगाने विस्तारत असलेल्या शहराला अत्याधुनिकतेकडे नेण्यासाठी लक्ष्मणभाऊंनी राज्य सरकार व महापालिकेचा समन्वय साधत विकास प्रत्यक्षात उतरवला, असेही त्यांनी नमूद केले.
लक्ष्मणभाऊ हे केवळ निवडणुका जिंकणारे नव्हते, तर मन जिंकणारे नेतृत्व होते. रस्ते, पाणीपुरवठा, सार्वजनिक वाहतूक, आरोग्य, शिक्षण व औद्योगिक विकासामुळे पिंपरी-चिंचवडला ठोस विकासाचा चेहरा मिळाला. ‘मिनी महाराष्ट्र’ म्हणून ओळख निर्माण होत असताना सर्वंकष विकासाचा नवा आयाम देण्याचे श्रेय त्यांनाच जाते, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
तसेच लक्ष्मणभाऊंची आध्यात्मिक बैठक, वारकरी संप्रदायाशी नाते, मातीशी असलेली नाळ व शिस्तबद्ध, लढवय्यी वृत्ती यांचा उल्लेख करत उड्डाणपूल, स्मार्ट सिटी, कचऱ्यापासून वीज निर्मिती, २४x७ पाणीपुरवठा (अमृत योजना), नदी सुधार प्रकल्प अशा योजनांमधून त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत, माजी आमदार अश्विनीताई जगताप, आमदार महेशदादा लांडगे, आमदार बापूसाहेब पठारे, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

94
2049 views