बिनविरोध विजयाचा गुलाल फिक्का पडणार? राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; चौकशीचे आदेश
जळगांव :- प्रतिनिधीराज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने निर्माण झालेल्या संशयाची गंभीर दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बिनविरोध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दबाव, धमकी किंवा प्रलोभनांचा वापर झाला का, याची सखोल चौकशी करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाली. त्यानंतर सत्ताधारी भाजप व शिवसेना पक्षांचे किमान १६ हून अधिक उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याचे समोर आले. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विरोधी पक्षांनी याबाबत तीव्र आक्षेप नोंदवले आहेत.या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने संबंधित प्रभागांतील निवडणूक निर्णय अधिकारी, महानगरपालिका आयुक्त (निवडणूक प्रभारी) तसेच पोलीस आयुक्त यांच्याकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. विरोधी पक्षांच्या उमेदवारांवर उमेदवारी अर्ज दाखल न करण्यासाठी दबाव, धमकी अथवा प्रलोभन देण्यात आले का, याची चौकशी या अहवालांच्या आधारे केली जाणार आहे.तोपर्यंत ज्या प्रभागांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, त्या ठिकाणचे निकाल जाहीर न करण्याचे स्पष्ट निर्देश आयोगाने दिले आहेत.दरम्यान, कल्याण-डोंबिवली, पनवेल आणि धुळे महानगरपालिकांमधील भाजप उमेदवारांचा बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांमध्ये समावेश असल्याची माहिती आहे.निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे बिनविरोध विजयाचा उत्साह ओसरू शकतो, तसेच पुढील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.