logo

एआयचा वापर पत्रकारांनी विवेकाने करावा – प्रा. डॉ. सदानंद मोरे

जळगाव, दि. ६ (प्रतिनिधी):
मुद्रणकलेनंतर जर कोणती मोठी क्रांती झाली असेल, तर ती कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाची आहे. मानवी मेंदूला टक्कर देण्याची क्षमता असलेली ही तंत्रज्ञान व्यवस्था अत्यंत संवेदनशील असून, तिचा वापर पत्रकारांनी अधिक सजगता व विवेकाने करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
मराठी पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्रातील दहा विद्यापीठांच्या जनसंवाद व पत्रकारिता विभागांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. ६ जानेवारी) ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि माध्यमे’ या विषयावर विशेष ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे हे सहावे वर्ष होते.
या संयुक्त कार्यक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (जळगाव), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (छत्रपती संभाजीनगर), पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (नांदेड), गोंडवाना विद्यापीठ (गडचिरोली) आणि श्रीमती दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (मुंबई) सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सदानंद मोरे होते. प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार डॉ. धनंजय बिजले व प्रा. डॉ. योगेश बोराटे यांनी मार्गदर्शन केले.
प्रा. डॉ. मोरे यांनी पत्रकारितेच्या विकासातील टप्पे स्पष्ट करताना एआयच्या सकारात्मक व नकारात्मक पैलूंवर प्रकाश टाकला.
डॉ. धनंजय बिजले यांनी एआयमुळे बातम्यांमध्ये साचेबद्धता व चुकीची माहिती पसरण्याचा धोका वाढत असल्याचे नमूद करत फॅक्ट-चेकिंगचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रा. डॉ. योगेश बोराटे यांनी संशोधन पत्रकारितेसाठी एआयचा प्रभावी वापर कसा करता येईल, यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
या ऑनलाइन व्याख्यानात राज्यातील विविध विद्यापीठांतील विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी व पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. संजय तांबट यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले, तर आभार डॉ. गोपी सोरडे यांनी मानले.

28
927 views