
बीड शहरात खळबळ! अंकुश नगरमध्ये प्लंबिंग कामगारावर गोळीबारानंतर धारदार शस्त्राने वार; शिंदे यांचा जागीच मृत्यू
बीड शहरातील अंकुश नगर परिसरात मंगळवारी दुपारी एक भीषण घटना घडली असून, प्लंबिंगचे काम करणाऱ्या शिंदे नामक कामगारावर अज्ञात व्यक्तीने थेट गोळीबार केला. गोळीबारानंतर हल्लेखोराने धारदार हत्याराने कामगाराच्या तोंडावर वार केल्याने शिंदे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या क्रूर हत्येमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शिंदे हे रोजच्या प्रमाणे कामावर असताना अचानक अज्ञात इसमाने त्यांच्यावर हल्ला केला. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरात एकच खळबळ उडाली. गंभीर जखमी अवस्थेत शिंदे जमिनीवर कोसळले आणि काही क्षणांतच त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसर सील करून पंचनामा करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असून वैयक्तिक वाद, जुनी भांडणे किंवा अन्य कारणांचा पोलीस तपास करत आहेत.
या घटनेने बीड शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भरदिवसा झालेल्या या हत्येमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत असून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे. पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.