
दौंड येथे डॉक्टरकडून अनुसूचित जातीतील तरुणास जातीवाचक शिवीगाळ : SC/ST ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल.
दौंड येथे डॉक्टरकडून अनुसूचित जातीतील तरुणास जातीवाचक शिवीगाळ : SC/ST ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल
दौंड (जि. पुणे) | प्रतिनिधी
दौंड शहरात एका डॉक्टरकडून अनुसूचित जातीतील तरुणास जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 767/2025 नुसार भारतीय दंड संहिता कलम 504 तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 चे कलम 3(1)(r) व 3(1)(s) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील फिर्यादी अनिकेत मनोहर सोनवणे (वय 25, रा. भिमनगर, दौंड)
असून आरोपी म्हणून डॉ. रविंद्र मुकुंद साठे (रा. आंबेडकर चौक, दौंड) यांचे नाव नमूद आहे.
फिर्यादीनुसार, दिनांक 08 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता महालक्ष्मी हॉस्पिटल, शालीमार चौक, दौंड येथे ही घटना घडली. फिर्यादीच्या बहिणीच्या उपचारादरम्यान डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे व उपचार प्रक्रियेतील गोंधळामुळे रुग्णाचा मृत्यू झाला. यानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या फिर्यादीस आरोपी डॉक्टरांनी “तुमच्यासारखे महारडे पैशांसाठी काहीही करतात, तुमच्यासारखे महारडे खूप मॅनेज केले आहेत” अशा शब्दांत जातीवाचक अपमान व धमकी दिल्याचा आरोप आहे.
ही संपूर्ण घटना सार्वजनिक ठिकाणी साक्षीदारांसमक्ष घडली असून, फिर्यादी अनुसूचित जातीचा असल्याची पूर्ण जाणीव आरोपीस असतानाही हा प्रकार केल्याचे FIR मध्ये नमूद आहे.
या गंभीर गुन्ह्याची दखल घेत दौंड पोलीस स्टेशनने गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. सदर प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) दौंड विभाग, Dy. SP दर्जाचे अधिकारी करत आहेत.
या घटनेमुळे सामाजिक न्याय, वैद्यकीय क्षेत्रातील जबाबदारी व कायद्याचा धाक याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक संघटना व नागरिकांकडून होत आहे.