logo

"Making of आई शक्तिदेवता" मराठी चित्रपटाच्या मेकिंगवर राज्यातील पहिलेच पुस्तक

सातारा येथे संपन्न होत असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर आज, ४ जानेवारी २०२६ रोजी, प्रदीप तुंगारे लिखित रफल्स पब्लिशिंग सर्व्हिस प्रकाशित 'मेकिंग ऑफ आई शक्तिदेवता' या वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. एखाद्या मराठी चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेवर (Making of) आधारित असलेले मराठीतील हे पहिलेच पुस्तक ठरले आहे.
'आई शक्तिदेवता' हा चित्रपट सन २००० मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने त्याकाळी मोठी लोकप्रियता मिळवली होती. राज्य शासनाकडून अनुदान मिळत नसताना हा चित्रपट, एका निर्मात्याने कसा निर्माण केला आणि यशस्वी कसा केला, याचा इतिहास यात लिहिला आहे. ऐश्वर्या नारकर, सुरेखा कुडची, उषा नाईक, यांच्या अभिनयाने साकारलेला हा चित्रपट सप्तशृंगी देवीच्या भक्ति आणि शक्ति विषयक होता. नामवंत गायकांची भक्तिगीते असलेला हा संगीतपट होता. आज पंचवीस वर्षांनंतर या चित्रपटाच्या पडद्यामागचा प्रवास, चित्रीकरणातील आव्हाने आणि तांत्रिक बाबी उलगडणारे पुस्तक वाचकांसाठी उपलब्ध झाले आहे. मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात एखाद्या सिनेमाच्या 'मेकिंग'वर स्वतंत्र पुस्तक लिहिण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याचे लेखक प्रदीप तुंगारे यांनी यावेळी नमूद केले. मराठी चित्रपट नव्याने निर्माण करणाऱ्या नवीन निर्मात्यांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, असे मत शिरीष चिटणीस यांनी पुस्तक प्रकाशनाच्या वेळी व्यक्त केले.
या सोहळ्याला चित्रपट कलावंत आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. व्यासपीठावर शिरीष चिटणीस, संगीतकार चंद्रमोहन हंगेकर, निर्माते पी. वाय. कोळी, वनराज कुमकर, प्रा.रवींद्र कोकरे, डॉ.संदीप श्रोत्री, रवीप्रकाश कुलकर्णी, नमिता कीर, निर्मोही फडके, मुकुंद फडके, डॉ. अनन्या कराळे, सुरेश गायकवाड, सिने कलावंत उल्हास आढाव आणि विशाल कराळे आदी मान्यवर उपस्थित होते. साहित्य संमेलनातील या आगळ्यावेगळ्या पुस्तकाची उपस्थित साहित्यप्रेमींमध्ये चर्चा रंगली होती.
प्रकाशक: रफल्स पब्लिकेशन सर्व्हिस, पुणे
किंमत: रुपये ३००

6
696 views
  
1 shares