logo

राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी,उत्तमचंद बगडिया महाविद्यालय, रिसोड येथे कार्यक्रम...

रिसोड : मुत्सद्दीपणा, नीतिमत्ता आणि बुद्धिमत्ता यांचा सुरेख संगम म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ, तर “उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका” असा प्रेरणादायी संदेश देणारे स्वामी विवेकानंद. या दोन महान व्यक्तिमत्त्वांच्या जयंतीनिमित्त उत्तमचंद बगडिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, रिसोड येथे जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विनोद कुलकर्णी होते. प्रमुख वक्ते म्हणून अध्यात्म, संस्कृती आणि समाज जागृतीचे प्रभावी वक्ते श्री जयंत वसमतकर उपस्थित होते. एनएसएस, सां.स. व इतिहास विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आपल्या मार्गदर्शक भाषणात श्री वसमतकर यांनी भारताच्या अध्यात्मिक परंपरेतील विवेकानंदांच्या योगदानाचा उल्लेख करताना सांगितले की, सतत चिंतन, धर्म, अध्यात्म आणि मानवसेवा ही त्यांच्या जीवनाची मुख्य दिशा होती. “भूतमात्रांची सेवा म्हणजे परमेश्वराची सेवा” या तत्त्वज्ञानाचा त्यांनी स्वतः आचरणातून पुरस्कार केला. परदेशात हिंदू धर्म व भारतीय संस्कृतीचा प्रचार-प्रसार करीत जागतिक स्तरावर ‘विश्वबंधुत्वा’चा संदेश त्यांनी दिला, असे ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. विनोद कुलकर्णी यांनी जिजाऊ व विवेकानंद यांच्या कार्याचा उल्लेख करताना युवकांना आव्हानांना तोंड देत धैर्याने पुढे जाण्याचा संदेश दिला. “संकटांच्या वेळी मागे न हटता, चिकाटीने मार्गक्रमण करा”, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. जिजाऊ ही प्रत्येकासाठी प्रेरणास्रोत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. खेडेकर यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी वैष्णवी घोडे हिने केले, तर आभार प्रदर्शन प्रीतम वैराळ यांनी मानले. विद्यार्थिनी मेघा इंगळे हिने जिजाऊ वंदना सादर केली तर सलोनी अंभोरे हिने ‘जिजाऊ सुंदर’ हे गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाला एनएसएस प्रमुख डॉ. ए.जी. वानखडे, प्रा. टिकार, प्रा. डॉ. बुधवंत, प्रा. डॉ. नंदेश्वर, प्रा. डॉ. मेश्राम, प्रा. पांढरे, प्रा. बाजड, प्रा. संदीप जुनघरे, प्रा. राम जुनघरे, प्रा. राऊत, प्रा. साबळे, प्रा. पाठक मॅडम, प्रा. बोंडे मॅडम, प्रा. वाघ,श्री ओंकार पूरी, डॉ. नरवाडे, डॉ. काळे मॅडम, प्रा. मनवर, प्रा. प्रजापती, गोपाल कोल्हे, संतोष घुगे, सुरज नरवाडे, ऋषी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

3
333 views