logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

हिंगोली: रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात घडली आहे. शेतीतील कामाच्या क्षुल्लक वादातून लहान भावान

हिंगोली: रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात घडली आहे. शेतीतील कामाच्या क्षुल्लक वादातून लहान भावाने आपल्या सख्ख्या मोठ्या भावाची कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला असून, पोलिसांनी अवघ्या दोन तासांत या प्रकरणाचा छडा लावत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
वसमत तालुक्यातील मौजे रांजोणा येथे ही दुर्दैवी घटना घडली. नवनाथ नामदेव सावळे (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे, तर गजानन नामदेव सावळे (वय २३) असे आरोपी भावाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १५ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास रांजोणा शिवारातील शेतातील आखाड्यावर नवनाथचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. अज्ञात व्यक्तीने तीक्ष्ण हत्याराने डोक्यात वार करून त्याची हत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.
असा झाला उलगडा
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) राजकुमार केंद्रे यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. सुरुवातीला हा खून कोणी केला असावा, याबाबत पोलिसांना कोणताही सुगावा नव्हता. मात्र, पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता, आडोशाला लपवलेली रक्ताने माखलेली एक कुऱ्हाड आढळून आली.
तपासादरम्यान हट्टा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि त्यांच्या पथकाला मृताचा धाकटा भाऊ गजानन याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. तो पोलिसांसमोर अतिशय सामान्य वागण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता, तो कोलमडला आणि त्यानेच आपल्या सख्ख्या भावाची हत्या केल्याची कबुली दिली.
हत्येचे कारण काय?
आरोपी गजाननने पोलिसांना दिलेल्या कबुलीनुसार, त्याचे आणि मृत नवनाथचे शेतातील कामावरून आणि इतर घरगुती कारणांवरून वारंवार खटके उडत होते. याच रागाच्या भरात, १५ जानेवारीच्या मध्यरात्री नवनाथ झोपेत असताना गजाननने त्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातले, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
हट्टा पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या दोन तासांत या खुनाचा उलगडा केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संग्राम जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले आणि त्यांच्या पथकाने केली. पोलिसांनी आरोपी गजाननला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

20
515 views

Comment