logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील राहुल पवार या युवकाचा पुण्यात भरधाव कारच्या धडकेत जागीच मृत्यू, ..


(पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे येथील सिंहगड रोड परिसरात भरधाव वेगाने आणि दारूच्या नशेत चालवलेल्या स्विफ्ट कारने दोन दुचाकींना धडक दिली. या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून, फ्लिपकार्टचा एक डिलिव्हरी बॉय जखमी झाला आहे. या प्रकरणी कारचालकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डिलिव्हरी बॉय वडगाव बुद्रुक परिसरात राहतात. ते सिंहगड रोड, सनसिटी आणि सिंहगड कॉलेज परिसरात डिलिव्हरीचे काम करतात. रात्री सिंहगड कॉलेज रोडवरील क्रिकेट ग्राऊंडजवळून ते आपल्या दुचाकीवरून (एमएच १२ एसआर ६१२७) जात असताना, समोरून भरधाव वेगात आलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारने (एमएच १४ केएन ०९५७) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेमुळे फिर्यादी बाजूला फेकले गेले. त्याच वेळी, त्या कारने मागून येणाऱ्या दुसऱ्या एका दुचाकीलाही (एमएच १८ बीएफ ००३६) धडक दिली. या अपघातात धुळे जिल्ह्यातील पाटण गावाचा रहिवासी राहुल दिनकर पवार (वय अंदाजे ३०, ) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने १०८ रुग्णवाहिकेने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्यांना मृत घोषित केले.
अपघातानंतर कारचालकाने जखमींना कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, स्थानिक नागरिकांनी आणि फिर्यादीने पाठलाग करत जाधवनगर परिसरात ती कार अडवली. त्यावेळी कारचे पुढील बोनट चेंगरलेले आणि समोरील काच फुटलेली होती.
पोलिसांनी कारमधील तिघांना ताब्यात घेतले. कारचालक म्हणून सोजल शामराव औटी (वय २२, रा. सेल पिंपळगाव, आळंदी) याचे नाव समोर आले. त्याच्यासोबत अभिषेक संजय शिंदे (वय २१, रा. कोळणे फाटा, आळंदी) आणि विघ्नहर्ता शामराव औटी (वय २७, रा. सेल पिंपळगाव, आळंदी) हे देखील कारमध्ये होते. ससून रुग्णालयात केलेल्या वैद्यकीय तपासणीत तिघेही दारूच्या नशेत असल्याचे निष्पन्न झाले.
सोजल औटी याने बेदरकारपणे आणि दारूच्या अंमलाखाली वाहन चालवून दोन दुचाकींना धडक दिली, ज्यामुळे एकाचा मृत्यू झाला आणि जखमींना मदत न करता तो पळून गेला. या प्रकरणी त्याच्यासह अन्य दोघांविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

265
14950 views

Comment