दौंडमध्ये बोरावके नगर ते देव पाम रस्ता महिनोन्महिने अर्धवट, नागरिकांची तीव्र नाराजी
दौंड शहरातील बोरावके नगर ते देव पामपर्यंतचा रस्ता विकासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र शासन व दौंड नगरपरिषद अंतर्गत मंजूर करण्यात आलेले हे काम कित्येक महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत
असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
मंजूर आराखड्यानुसार बोरावके नगर ते देव पामपर्यंत संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात हे काम सरपंच वस्ती, संविधान तिरंगा चौकापर्यंतच करण्यात आले असून त्यापुढील भागात रस्ता खोदून खडी व मुरूम टाकून काम थांबवण्यात आले आहे.
सध्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी पसरलेली असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुचाकी, सायकलस्वार व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी हा मार्ग अधिक धोकादायक ठरत आहे. खडीवरून वाहने घसरत असल्याने अपघाताचा धोका देखील वाढला आहे.
पावसाळा जवळ येत असताना या रस्त्यावर चिखल व पाणी साचण्याची शक्यता असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काम सुरू करून महिनोन्महिने अर्धवट ठेवणे ही गंभीर बाब असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
संबंधित ठेकेदार व प्रशासनाने तातडीने उर्वरित रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी बोरावके नगर ते देव पाम परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.