logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

कोकण विभाग पाचवे साहित्य संमेलन २०२६ : ज्येष्ठ साहित्यिका अनुपमा जाधव यांची संमेलनाध्यक्षपदी निवड

कोकण विभाग पाचवे साहित्य संमेलन २०२६ : ज्येष्ठ साहित्यिका अनुपमा जाधव यांची संमेलनाध्यक्षपदी निवड

अमळनेर प्रतिनिधी :
डहाणू येथील के. एल. पोंदा हायस्कूलच्या उपक्रमशील, आदर्श शिक्षिका तसेच ज्येष्ठ साहित्यिका मा. अनुपमा जाधव यांची ‘आपुलकी साहित्य परिवार’ आयोजित कोकण विभाग पाचवे साहित्य संमेलन २०२६ साठी संमेलनाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे साहित्य क्षेत्रात आनंदाची लहर पसरली असून विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

अनुपमा जाधव या केवळ शिक्षिका नसून त्या एक संवेदनशील कवयित्री, कथाकार, पर्यावरणप्रेमी व प्रभावी निवेदिका म्हणूनही ओळखल्या जातात. समुद्रसंगीत, वहिवाट, रानझरा हे त्यांचे काव्यसंग्रह तर अनुबंध हा कथासंग्रह प्रकाशित असून आभाळगाणी या काव्यसंग्रहासाठी त्यांच्या कवितांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या साहित्यकृतींमध्ये निसर्ग, समाजजीवन, स्त्रीमन आणि मूल्यसंस्कारांचा सुंदर संगम आढळतो.
स्वच्छता आणि पर्यावरण जनजागृतीसाठी त्यांनी लिहिलेली स्वच्छ भारत अभियान प्रबोधन गीत, प्लास्टिक प्रदूषण दूर करू या! तसेच शाळेसाठीचे गौरव गीत ही गीते विविध कार्यक्रम, रॅली आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सादर होत असून समाजमनाला जागृत करण्याचे कार्य करीत आहेत.
शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावरील ५५ पेक्षा अधिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. राज्यस्तरीय साहित्य भूषण पुरस्कार, सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार, राष्ट्रीय गुणवंत शिक्षक पुरस्कार, ग्लोबल टीचर अवॉर्ड, निसर्ग मित्र पुरस्कार आदी मानाचे पुरस्कार त्यांच्या कार्याची साक्ष देतात.
आकाशवाणी मुंबई, नाशिक व पुणे केंद्रांवर त्यांनी कथाकथन, काव्यसादरीकरण, पर्यावरण जनजागृती व मुलाखतींच्या माध्यमातून प्रभावी सहभाग नोंदविला आहे. विद्यार्थ्यांसाठी “कविता फुलते कशी?” या उपक्रमातून त्यांनी महाराष्ट्रभर मार्गदर्शन केले आहे. तसेच लघुनाट्य लेखन व दिग्दर्शनातूनही त्यांनी आपली साहित्यसेवा विस्तारली आहे.
यापूर्वीही त्यांनी विविध साहित्य संमेलनांमध्ये अध्यक्ष, विशेष अतिथी, प्रमुख वक्त्या म्हणून सहभाग घेतला आहे. मायबोली संवर्धनासाठी गेल्या १८ वर्षांपासून त्या सातत्याने कार्यरत आहेत.
रविवार, दिनांक २२ फेब्रुवारी रोजी हिल टच फार्म हाऊस अँड रिसॉर्ट, विजयगड (ता. वाडा) येथे हे साहित्य संमेलन उत्साहात संपन्न होणार आहे. या संमेलनास खासदार डॉ. हेमंत सावरा, नगराध्यक्ष सौ. सीमा गंधे, डॉ. गिरीश चौधरी, नरेश आकटे, दिनेश पांडे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
‘आपुलकी साहित्य परिवार’च्या वतीने कोकण विभागातील साहित्यिक, कवी-कवयित्री व साहित्यरसिकांसाठी हे पाचवे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून संस्थापक हिमांशू पाटील (सरकारी वकील) यांचे विशेष योगदान लाभले आहे. अध्यक्ष प्रितेश पटेल, कार्याध्यक्ष मनाली राऊत, सहसंस्थापक अनंत पांडुरंग पाटील व इतर पदाधिकारी या संमेलनाच्या यशासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.
या संमेलनासाठी ७३ साहित्यिकांनी कविता सादरीकरणासाठी नोंदणी केली असून सर्वांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. नवोदित कवींना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणारे हे संमेलन साहित्य क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
अनुपमा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणारे हे साहित्य संमेलन कोकण विभागाच्या साहित्य परंपरेला नवी दिशा देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

11
4124 views

Comment