महालक्ष्मी नगर, सोलगे मळा, शहापूर येथील अज्ञाताचे खुनाचा
गुन्हा उघड, तीन आरोपी ताब्यात.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई !!!
दिनांक १८/०२/२०२६ रोजी पहाटेच्या सुमारास महालक्ष्मी नगर, सोलगे मळा, शहापूर, ता.हातकणंगले येथे निर्जन स्थळी एका तरुणचा मृतदेह मिळून आला होता. सदर मृतदेहाचे चेह-यावर ठिक ठिकाणी दगडाने ठेचले होते. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटत नव्हती. पहाटेच्या वेळी सदरचा मृतदेह निर्जन स्थळी मिळून आलेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
कोल्हापूर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता यांनी सदर खुनाचे गुन्हयाचे ठिकाणी भेट देवून गुन्हयाचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना सुचना दिल्या होत्या.
मा.पोलीस अधीक्षक सो, कोल्हापूर यांनी दिले सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदारांसह गुन्हयाचे ठिकाणी भेट दिली. त्यानंतर सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ व पोलीस उप निरीक्षक जालिंदर जाधव यांच अधिपत्याखाली वेगवेगळी पथके तयार केली. यातील सपोनि सागर वाघ यांचे पथकास मयत घडले ठिकाणचे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करणे व पोसई जालिंदर जाधव यांचे पथकास मयताचे फोटो व प्राप्त माहितीच्या आधारे परिसरातील इंडस्ट्रीयल, झोपडपट्टी व मजूर वर्ग राहणेस असलेल्या भागात मयताची ओळख पटवून त्याचे नातेवाईकांचा शोध घेणेच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे तपास पथके कार्यरत झाली.
सदर मयताचे सोशल मिडीयावर प्रसारित झालेल्या बातमीच्या आधारे नातेवाईक मिळून आलेवर मयताचे नाव शाहबाज शब्बीर शेख वय २३, रा. शामराव नगर, सांगली, ता. मिरज, जि.सांगली असे असलेचे समजले. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मयताचे नातेवाईकांना विश्वासात घेवून विचारणा केली असता मयत शाहबाज हा गेले दोन दिवसांपासून त्याचे मित्रांसह बाहेर असून तो घरी आला नसलेचे समजले. त्याबाबत अधिक माहिती घेतली असता शाहबाज हा त्याचे स्प्लेंडर मोटर सायकलवरुन त्याचे मित्र आसिफ यलकुंद्री व सोहेल सनदी दोघे रा.शामराव नगर, सांगली याचेसोबत गेला असलेचे समजले. त्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेज पडताळणी केली असता त्यांचे सोबत अखिल मुजावर रा. कृष्णा नगर, इचलकरंजी हा देखील असलेचे निष्पन्न झाले.
सदरचे तीघे मयत शाहबाज शेख याची स्प्लेंडर मोटर सायकल घेवून हातकणंगले परिसरात फिरत असलेचे समजले. त्या अनुषंगाने सपोनि सागर वाघ व सपोनि प्रशांत निशाणदार असे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह आरोपींचा शोध घेत असताना नरंदे, ता. हातकणंगले गावात आढळून आले. त्यांना पोलीसांची चाहूल लागलेने आरोपींना पळून जाणेचा प्रयत्न केला त्यावेळी पथकाने प्रसंगावधान दाखवून आरोपींना पाठलाग करुन नरंदे गावचे शिवारात मोठ्या शिताफीने आरोपींना ताबेत घेतले. आरोपींना त्याचे व पत्ते विचारले असता त्यांनी आपली नावे १) आसिफ जिलानी यलकुंद्री वय २८, रा. तिरंगा चौक, शामराव नगर, सांगली, जि. सांगली २) सोयल सलीम सनदी वय ३०, रा. विश्व विनायक चौक, शामराव नगर, सांगली, जि. सांगली ३) अखिल इसायली मुजावर वय २६, रा. महाराष्ट्र गल्ली, कृष्णा नगर, शहापूर रोड, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर अशी असलेची सांगितले.