logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

भंडाऱ्याचे सुपुत्र राकेश सुखदेवे यांची महाराष्ट्र सब-ज्युनियर हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड

विलास केजरकर भंडारा.

भंडारा: क्रीडा क्षेत्रातील भंडाऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) मध्ये हॉकी प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेले भंडाऱ्याचे सुपुत्र राकेश सुखदेवे यांची महाराष्ट्र सब-ज्युनियर पुरुष हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे जिल्हाभरात आनंदाचे वातावरण असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सब-ज्युनियर पुरुष राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे आयोजन दि. १ एप्रिल ते १२ एप्रिल २०२६ दरम्यान राजगीर (बिहार) येथे करण्यात आले आहे. या अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धेत महाराष्ट्र संघाच्या विजयाची धुरा आता राकेश सुखदेवे यांच्या अनुभवी खांद्यावर असणार आहे.
या राष्ट्रीय स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र संघाचे विशेष प्रशिक्षण शिबिर सध्या पुणे येथे सुरू आहे. १९ मार्चपासून सुरू झालेले हे शिबिर २ एप्रिलपर्यंत चालणार आहे. या शिबिरात राकेश सुखदेवे खेळाडूंना आधुनिक तंत्रज्ञान आणि रणनीतीचे धडे देत आहेत. त्यानंतर २ एप्रिल रोजी महाराष्ट्र संघ राजगीरकडे रवाना होईल.
महाराष्ट्र संघाचा समावेश 'पूल A' मध्ये करण्यात आला असून, साखळी फेरीत महाराष्ट्राला बलाढ्य संघांशी झुंजावे लागणार आहे. राकेश सुखदेवे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संघ यंदा पदकाची कमाई करेल, अशी खात्री क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली आहे. सुखदेवे यांच्या या यशाबद्दल भंडारा जिल्ह्यातील क्रीडा संघटना आणि जिल्हा प्रशासनाने त्यांचे विशेष कौतुक केले आहे.

9
36 views

Comment