logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

गडचिरोलीत जमीन संपादन शेतकरीहित जपूनच; जबरदस्ती नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

योग्य मोबदला व पुनर्वसनाची हमी; मध्यम मार्ग काढण्याचे आवाहन

गडचिरोली/नागपूर दि. ४ : गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात प्रस्तावित उद्योगासाठी जमीन संपादन करताना शेतकऱ्यांचे हित अबाधित ठेवले जाईल. कोणत्याही परिस्थितीत जबरदस्ती केली जाणार नाही आणि संबंधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त योग्य मोबदला देण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

रामगिरी येथे आज गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या नेतृत्वाखाली चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्यासह संबंधित पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, गडचिरोली जिल्हा औद्योगिक विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून ‘लोह व पोलाद हब’ म्हणून उदयास येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्योग उभारणीसाठी जमीन संपादन आवश्यक असले तरी शासनाचा उद्देश शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारची सक्ती करण्याचा नाही. सर्व संबंधित घटकांशी सविस्तर चर्चा करून सामंजस्याने मध्यम मार्ग काढत जमीन संपादनाची प्रक्रिया राबविण्यात येईल.

उद्योगांच्या माध्यमातून स्थानिक भूमिपुत्रांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, यावर भर देत त्यांनी सांगितले की, जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय्य मोबदल्यासोबतच पुनर्वसनाचीही योग्य व्यवस्था केली जाईल. विकास प्रक्रियेत सर्वांना सहभागी करून घेण्याचा शासनाचा प्रयत्न असून, शेतकऱ्यांनीही सकारात्मक भूमिका घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कोणाचीही जमीन बळजबरीने घेण्याचा शासनाचा कोणताही मानस नसून स्वेच्छेने जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न राहील. तसेच स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उद्योगांशी समन्वय साधून आवश्यक ती पावले उचलली जातील, असेही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.

154
1800 views

Comment