logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

बिहारच्या साखर कारखानदारीत विकासाचे नवे पर्व; राष्ट्रीय साखर महासंघ आणि बिहार सरकारमध्ये ऐतिहासिक करार...


नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारचा साखर उद्योग कायापालट करणार - हर्षवर्धन पाटील

समर्थ न्युज नेटवर्क :

बिहार राज्यातील साखर कारखानदारीला आधुनिकतेची जोड देऊन शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. बिहार सरकारचा ऊस उद्योग विभाग आणि नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ यांच्यात नुकताच एक ऐतिहासिक सामंजस्य करार (MoU) पार पडला. या करारामुळे बिहारच्या साखर उद्योगात प्रगतीचे नवे पर्व सुरू होत असल्याचे गौरवोद्गार महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
सोमवारी (दि. ३०) पाटणा येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी बिहारचे ऊस उद्योग विकास मंत्री संजय कुमार, अप्पर मुख्य सचिव के. सेंथिल कुमार यांच्यासह महासंघाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

बिहार सरकारच्या "समृद्ध उद्योग - सशक्त बिहार" या योजनेअंतर्गत हा करार करण्यात आला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले की, "राष्ट्रीय महासंघ ही देशातील साखर क्षेत्रातील सर्वोच्च संस्था आहे. आमच्याकडे असलेला दशकांचा अनुभव आता बिहारच्या साखर उद्योगाच्या आधुनिकीकरणासाठी वापरला जाईल. महासंघ आता बिहारमधील साखर कारखान्यांसाठी 'तज्ज्ञ नोडल एजन्सी' म्हणून काम करेल."

नव्या साखर प्रकल्पांचे काम वेगात
बिहारमध्ये प्रस्तावित असलेल्या दोन नवीन साखर युनिट्ससाठी 'ऊस व्यवहार्यता अहवाल' (CFR) आणि 'सविस्तर प्रकल्प अहवाल' (DPR) तयार करण्याची जबाबदारी महासंघावर सोपवण्यात आली होती. ही जबाबदारी महासंघाच्या टीमने विक्रमी वेळेत पूर्ण केल्याचेही पाटील यांनी नमूद केले.

कराराची प्रमुख वैशिष्ट्ये:

* तांत्रिक मार्गदर्शन: संपूर्ण साखर मूल्य साखळीमध्ये बिहार सरकारला तांत्रिक आणि धोरणात्मक सहकार्य लाभणार.
* उत्पादकता वाढ: ऊस लागवडीचा विस्तार करणे आणि प्रति एकरी उत्पादकता वाढवण्यावर भर.
* पुनरुज्जीवन: बंद पडलेले साखर कारखाने पुन्हा सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न होणार.
* शेतकरी हित: विकासाची संपूर्ण प्रक्रिया ही शेतकरी-केंद्रित असेल, ज्यामुळे ऊस उत्पादकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी साखर उद्योगाच्या पुनरुज्जीवनासाठी अत्यंत सक्रिय आणि दूरदर्शी पावले उचलली आहेत, अशा शब्दांत हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. तसेच, देशाचे सहकार मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी साखर कारखानदारीला नवी दिशा मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

या दौऱ्यादरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी बिहारचे मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. बिहारमध्ये नवीन सहकारी साखर कारखाने सुरू करणे आणि सहकारी संस्थांचे जाळे मजबूत करणे यावर या बैठकीत एकमत झाले.

या कार्यक्रमाला राष्ट्रीय महासंघाचे उपाध्यक्ष केतनभाई पटेल, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, मुख्य ऊस सल्लागार आर. बी. डाॅले आणि बिहार सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

5
170 views

Comment