*इयत्ता 11 वी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; विद्यार्थ्यांनी 'भाग-1' अर्जाची नोंदणी करावी: प्राचार्य संजय देशमुख यांचे आवाहन.*
*इयत्ता 11 वी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; विद्यार्थ्यांनी 'भाग-1' अर्जाची नोंदणी करावी: प्राचार्य संजय देशमुख यांचे आवाहन.*
रिसोड महेंद्र कुमार महाजन
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वीच्या परीक्षा संपल्यानंतर, आता सर्वांचे लक्ष 11 वीच्या ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेकडे लागले आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया अधिकृतपणे दि.10 एप्रिल पासून सुरू झाली असून, शासनाने यासंदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पत्र निर्गमित केले आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांनी वेळेत प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात करावी, असे आवाहन प्राचार्य संजय देशमुख यांनी केले आहे.
अर्ज भरण्याची प्रक्रिया दोन टप्प्यात पार पडणार असून प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी ती दोन भागांत विभागली गेली आहे. सध्या सुरू झालेला 'भाग-1' (Part-1) हा अत्यंत महत्त्वाचा असून यामध्ये विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती, आरक्षण, प्रवर्ग आणि इतर कागदपत्रांची नोंदणी करायची आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी 10 वीची परीक्षा दिली आहे, त्यांनी अधिकृत पोर्टलवर जाऊन आपला लॉगिन आयडी तयार करावा.
माहिती मध्ये नाव, जन्मतारीख आणि संपर्क क्रमांक भरताना विशेष काळजी घ्यावी.
जातीचा दाखला, नॉन-क्रिमिलेयर किंवा इतर आरक्षणाचे लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली प्रमाणपत्रे त्वरित स्कॅन करून अपलोड करावीत.
प्रवेश अर्जाचा भाग- 2 10 वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्जाचा भाग-2 ( कनिष्ठ महाविद्यालय पसंतीक्रम) भरता येईल, मात्र त्याआधी भाग-1 पूर्ण असणे अनिवार्य आहे.
"शासनाने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेशाचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या मदतीने 'भाग-1' चा अर्ज अचूक भरावा. तांत्रिक अडचणी आल्यास आपल्या शाळेतील शिक्षकांशी किंवा मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा," असे आवाहन प्राचार्य संजय देशमुख यांनी केले आहे.
प्रवेशासाठी अधिकृत संकेतस्थळ: [ https://mahafyjcadmissions.in]