'जय भीम' शब्द कसा तयार झाला? भारतात पहिल्यांदा जय भीम अशी घोषणा कोणी, कधी आणि कुठे केली.....?
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती आहे. कोट्यावधी अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करत आहेत. जयंती निमित्ताने देशभरात 'जय भीम'चा नारा घमत आहे. मात्र, तुम्हाला माहित आहे का 'जय भीम' शब्द कसा तयार झाला? भारतात पहिल्यांदा जय भीम अशी घोषणा कोणी, कधी आणि कुठे केली? जाणून घेऊया रंजक इतिहास.
आंबेडकरांना मानणारा प्रत्येक व्यक्ती अभिमानाने जय भीम बोलतो. जय भीष या शब्दांरवर अनेक जाणी देखील रचली गेली आहे. आंबेडकरांचे अनुयायी एकमेकांना भेटल्यावर जय भीम असे म्हणतात. जय भीम ही फक्त घोषणा नाही तर... एक ओळख आहे. हरदास लक्ष्मणराव नगराळे उर्फ बाबू हरदास हे `जय भीम’ या घोषणेचे चे जनक आहेत. दलित समुदायाचे लोक `जय भीम’ हा शब्द मोठय़ा आदरभावाने उच्चारतात. आंबेडकरी समाजातील राजकारणात अनेक गट-तट असो किंवा आंबेडकरी समाजातील नेते इतर पक्षात स्थिरावलेले असो त्यांच्या मुखातून वेळोवेळी आपसूकपणे `जय भीम’ हे शब्द बाहेर पडतात. हरदास लक्ष्मणराव नगराळे यांनीच प्रथम जय भीषची घोषणा दिली.
हरदास लक्ष्मणराव नगराळे हे मुळचे नागपूरचे आहेत. 6 जानेवारी 1904 रोजी त्यांचा जन्म नागपुरातील कामठी येथे एका गरीब दलित कुटूंबात झाला. त्यांचे वडील लक्ष्मणराव नगराळे हे रेल्वे खात्यामध्ये कारकून म्हणून कार्यरत होते. बाबू हरदास यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण नागपुरातील पटवर्धन हायस्कूलमध्ये झाले. त्यांचा संस्कृतवरही मोठा प्रभाव होता. अवघ्या 17 व्या वर्षी `महारथ’ नावाचे साप्ताहिक सुरू करून त्यांनी सामाजिक चळवळीत भाग घेतला. 1927 त्यांनी दलित समाजातील मुला-मुलीसाठी कामठी येथे रात्र शाळाही चालवली. त्यात 86 मुले आणि 22 मुली शिकून बाहेर पडल्या. संत चोखामेळा यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत पहिली भेट
1928 साली हरदास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत त्यांची पहिली भेट झाली. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या सचिवपदीही त्यांची नियुक्ती करण्यात आली. 1937 साली नागपूर-कामठी या मतदारसंघातून ते निवडून आले होते. बाबू हरदास यांचे दलित चळवळीत खूप मोठे योगदान आहे. त्यांनी दिलेला `जय भीम’ शब्द हा अजरामर असाच आहे. म्हणूनच आज ते `जय भीम’चे जनक म्हणून ओळखले जातात.
पहिल्यांदा जय भीमची घोषणा दिली
‘जय भीम’चा अर्थ "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो" असा होय. ‘जय’ म्हणजे ‘विजय’ आणि ‘भीम’ हे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव आहे. हरदास लक्ष्मणराव नगराळे हे बाबासाहेबांचे कट्टर अनुयायी होते. उपलब्ध माहितीनुसार 1930 च्या दशकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रातील मराठवाड्यात 1938 च्या मकरानपूर परिषदेसारख्या सार्वजनिक सभांमध्ये जातीय अत्याचारांविरुद्ध आवाज उठवण्याचा एक मार्ग म्हणून ही घोषणा लोकप्रिय झाली. 12 जानेवारी 1939 साली वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी हरदास लक्ष्मणराव नगराळे यांचे निधन झाले.
लोकप्रिय घोषणा बनली
महाराष्ट्रात जय भीमचा नारा खूपच लोकप्रिय झाला. 1956 मध्ये डॉ. आंबेडकरांच्या निधनानंतर, या घोषणेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. दलित-बौद्ध चळवळीतील एक मुख्य अभिवादन बनली. जय भीम हा शब्दाचा अर्थ स्वाभिमानाने प्रणाम, सन्मानाने अभिवाद आणि शुभेच्छा असा देखील आहे. कोट्यवधी भारतीय व्यक्ती, राष्ट्रीय नेते 'जय भीम'चा नारा देतात.