logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

शहापूर तानशेत येथे आदिवासींच्या जमिनी वर परप्रांतीयांचे अतिक्रमण स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांचे तहसील कार्यालय समोर उपोषण

शहापूर/ साजिद शेख
भूमिहीन शेतकऱ्यांना शासनाकडून वाटप करण्यात आलेल्या आदिवासी बांधवांच्या जमिनीवर परप्रांतीयांनी बेकायदेशीर अतिक्रमण करुन राजरोसपणे सुरू असलेल्या प्लॉट विक्रीच्या विरोधात शुक्रवारी शहापुर तहसील कार्यालयासमोर स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी तहसीलदारांकडे या परप्रांतियांवर कारवाई करण्याची मागणी केली.

मध्यरेल्वेच्या तानशेत स्थानकालगत पश्चिमेला आदिवासी बांधवाना शासनाकडून भूमिहीन शेतकरी म्हणून जागा देण्यात आल्या आहेत. परंतू. शेतकऱ्यांना मिळालेल्या प्लॉटवर परप्रांतीयांनी अतिक्रमण केले असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. वस्तुतः आदिवासी जमिन खरेदी – विक्रीसाठी शासनाच्या विविध परवानग्या आवश्यक असतात.

प्रत्यक्षात बेकायदेशीर अतिक्रमण केलेल्या परप्रांतीयांनी शासनाच्या कोणत्याही परवानग्या घेतलेल्या नसल्याचे समोर आले आहे. या जागांवर त्यांनी व्यापारी गाळे आणि घरे बांधून त्याची विक्री करत आहेत. तर, काही ठिकाणी प्लॉटिंग करून अडीच लाख रुपये एक गुंठा याप्रमाणे राजरोसपणे विक्री सुरू केली आहे.परप्रांतीयांच्या या गोरखधंद्या विरोधात विरल भेरे, संभाजी भेरे यांसह स्थानिकांनी तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी आंदोलन केले. आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या आणि या प्रकरणात दोषी असणाऱ्यांची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करावे आणि अतिक्रमण त्वरित जमिनदोस्त करावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांकडे केली.

या अतिक्रमणाबाबत चौकशी सुरू करून बेकायदेशीर बांधकाम किंवा प्लॉटिंग झाल्याचे आढळून आल्यास त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. परंतू, या आश्वासनांची अंमलबजावणी झाली नाही, तर पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

26
1292 views

Comment